PMC Elections : पालिका निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना आता सुट्टी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:05 IST2025-11-06T11:05:28+5:302025-11-06T11:05:46+5:30
पालिका निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना आता सुट्टी नाही;निवडणूक विभाग उपायुक्त यांचे आदेश

PMC Elections : पालिका निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचारी, अधिकाऱ्यांना आता सुट्टी नाही
पुणे : पुणे महापालिकेतील काही कर्मचारी आणि अधिकारी यांची नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी केली आहे. मात्र काही लोक कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता निवडणूक होईपर्यंत संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रजा किंवा सुट्टी मिळणार नाही, असे आदेश निवडणूक विभागाचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिले आहेत.
पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे कामकाज राज्य निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार सुरू आहे. सद्य:स्थितीत प्रभाग रचनेची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. प्रारूप मतदार याद्यांचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे. निवडणूक विषयक इतर कामे ही अतित्व व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक आहेत.
निवडणूक कर्तव्यावर काम करत असताना अधिकारी आणि कर्मचारी रजेवर जात आहेत. त्यामुळे निवडणूक कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे संपूर्ण कामकाज पूर्ण होईपर्यंतचे कालावधीत निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची कोणत्याही प्रकारची रजा किंवा सुट्टी ही निवडणूक कार्यालयाची पूर्वपरवानगीशिवाय मान्य करू नये, असे उपायुक्त यांनी प्रसाद काटकर यांनी आदेशात नमूद केले आहे.