PMC Elections : भाजप - महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने केला मतदार यादीत फेरफार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 10:46 IST2025-12-10T10:44:11+5:302025-12-10T10:46:28+5:30
- भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात घडला प्रकार, सीसीटीव्ही चित्रीकरण जाहीर करत संजय बालगुडे यांचा गौप्यस्फोट,पालिका आयुक्त, निवडणूक आयोगाने कारवाई करावी

PMC Elections : भाजप - महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने केला मतदार यादीत फेरफार
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या. मात्र, त्यापूर्वीच भाजप पदाधिकारी आणि महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी एकत्र बसून वेगवेगळ्या मतदार याद्या फोडत होते.
या प्रभागामधील मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये टाकत मतदार यादीत संगनमताने फेरफार केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे यांनी केला आहे. याचे सीसीटीव्ही चित्रीकरणही यावेळी दाखविण्यात आले. या धक्कादायक प्रकरणाची सखोल चौकशी करून भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
भाजप पदाधिकारी व महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांचा तब्बल साडेचार तास हा धक्कादायक प्रकार सुरू होता. महापालिका आयुक्त व राज्य निवडणूक आयोग यांनी ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यानच्या काळातील क्षेत्रीय कार्यालयांमधील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेऊन भाजप पदाधिकारी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
निवडणूक आयोगाने प्रामाणिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मदतीने मतदार याद्या तयार कराव्यात. तोपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया आयोगाने थांबवावी, अशी मागणीही संजय बालगुडे यांनी केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे उपस्थित होते.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच भाजपबरोबर अधिकारी साडेचार तास बैठक घेऊन मतदार यादी बदलतात. २० दिवस अगोदरच गोपनीय याद्या फोडतात. हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी डॉ. विश्वंभर चौधरी यांनी सांगितले.
हा तर मतचोरीचा प्रकार
मतदार याद्यांमध्ये फेरफार करणे हे पूर्वनियोजित षडयंत्र आहे. मतदार याद्या प्रसिद्ध होण्यापूर्वीच त्या फोडायच्या, त्यामध्ये बदल करायचे व मतदारांना दुसऱ्या प्रभागामध्ये टाकायचे. हा तर मतदान चोरीचा अभिनव प्रकार आहे. आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारची दखल घेऊन स्वतः निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करावी, अशी मागणी ॲड. असीम सरोदे यांनी केली.
चौकशी समिती नेमली
भाजप पदाधिकारी आणि महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांनी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यापूर्वी फेरफार केल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे आली आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी निखिल मोरे यांची चौकशी समिती नेमली आहे. ही समिती संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणी नोटीस देऊन खुलासा मागविणार आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल. -प्रसाद काटकर, निवडणूक विभाग प्रमुख, पुणे महापालिका