पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपसह सर्व पक्षांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक होते; पण भाजपने ऐनवेळी ४० माजी नगरसेवकांचे पत्ते कट केले. उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिंदेसेनेत प्रवेश केले. त्यामुळे या निवडणुकीत आयाराम गयारामची चलती झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील निष्ठावंतांसह कार्यकर्ते नाराज झाले. ही नाराजी विविध आश्वासने देऊनही दूर करता आलेली नाही. त्यामुळे नाराज कार्यकर्ते प्रचारात उतरले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात तरी या नाराजीचे ग्रहण सुटणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यासाठी २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या ४० नगरसेवकांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे हे माजी नगरसेवक आणि त्याचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. उमेदवारीसाठी पात्र असताना डावलले गेल्याने नाराजांना पक्षाचे आमदार आणि नेते भेटत असले तरी हे नाराज प्रचारात उतरण्यास तयार नाहीत. पालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार संपण्यासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी राहिला आहे. तरीही नाराज कार्यकर्ते प्रचारात दिसत नाहीत. काही नाराज केवळ प्रचाराच्या वेळी तोंड दाखविण्यासाठी समोर येत आहेत. ही नाराजी कायम असल्याने त्याच्याकडून उमेदवारांना सहकार्य होत नाही. त्यामुळे पक्षातील दुताच्या माध्यमातून नाराज लोकांशी संपर्क साधला जात आहे; पण तरीही नाराज कार्यकर्ते प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे प्रचार करताना काही ठिकाणी उमेदवारांचा जीव मेटाकुटीला आला आहेे.
आश्वासनाची खैरात होऊनही नाराजी कायम
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस होती. उमेदवारी मिळाली नाही तेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षाकडून स्वीकृत सदस्य, पक्षीय समित्या, वेगवेगळ्या शासकीय समित्यांची आश्वासने देत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले आहे; मात्र त्यानंतर हे नाराज झालेले कार्यकर्ते पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारातून गायब झाले आहेत.
सुप्रिया सुळे प्रचारातून गायब
पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार )आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे दोन्ही गट एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात ठाण मांडून बसले आहेत; पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या अद्यापही पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारात दिसत नाहीत. त्यामुळे सुप्रिया सुळे प्रचारातून गायब असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
Web Summary : Pune's PMC election sees disgruntled party workers due to denied candidacies. Ajit Pawar campaigns actively, while Supriya Sule's absence fuels political speculation amid the election fervor.
Web Summary : पुणे पीएमसी चुनाव में उम्मीदवारी से वंचित कार्यकर्ताओं में असंतोष है। अजित पवार सक्रिय रूप से प्रचार कर रहे हैं, जबकि सुप्रिया सुले की अनुपस्थिति चुनावी सरगर्मी के बीच राजनीतिक अटकलों को हवा दे रही है।