पुणे : येत्या १५ तारखेला होणारे मतदान केवळ निवडणूक नसून तुमच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा निर्णय आहे, असे सांगत पुणे महापालिकेत परिवर्तन घडवून यावेळी पुण्याचा कारभारी बदलणार असल्याचा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते शुक्रवारी नाना पेठेतील संत कबीर चौकात आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर शिंदेसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय प्रमुख सुधीर जोशी यांच्यासह शिवसेनेच्या उमेदवारांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, मी जिथे-जिथे सभेला जातो, तिथे लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. विधानसभेत जे परिवर्तन झाले, तेच परिवर्तन आता महापालिकेत घडेल.’’
‘‘मुख्यमंत्री असताना राबवलेल्या लाडकी बहिण योजना, महिलांना एसटीमध्ये ५० टक्के सवलत, मुलींना मोफत शिक्षण, युवकांसाठी रोजगार योजना यांचा त्यांनी उल्लेख केला. गृहनिर्माण मंत्री म्हणून शहरातील वाड्यांचा विकास व म्हाडामार्फत सर्वसामान्यांना घरे देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पुणे गुन्हेगारीमुक्त, गुंडगिरीमुक्त व भ्रष्टाचारमुक्त हवे असल्यास महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना शहर प्रमुखांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत, पुणे सांस्कृतिक शहर आहे. परंतू येथे गुंडगिरी वाढली आहे. भ्याड हल्ला करून असे पळून जाऊ नका, हिंमत असे तर समोर येउन लढाई करा. मी आधी अनेक ऑपरेशन केले आहेत. कोणाची सर्जरी करायची व कोणाला गोळी द्यायची हे मला चांगले माहीत आहे. शिवसेना महापालिका निवडणुकीत किंगमेकर ठरेल. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेचा जाहिरनाम्याचे वाचन केले तर सामंत यांनी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचे वचन दिले.