अपघात रोखण्यासाठी सरसावली पीएमपी!

By Admin | Updated: March 24, 2015 00:23 IST2015-03-24T00:23:10+5:302015-03-24T00:23:10+5:30

ब्रेक फेल, आॅईल गळती, अन्य तांत्रिक बिघाड तसेच बसचालकांच्या चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सरसावले

PM to save the accident! | अपघात रोखण्यासाठी सरसावली पीएमपी!

अपघात रोखण्यासाठी सरसावली पीएमपी!

पुणे : ब्रेक फेल, आॅईल गळती, अन्य तांत्रिक बिघाड तसेच बसचालकांच्या चुकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) सरसावले असून, विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच काही उपाययोजनांवर काम सुरू असून, त्या लवकरच प्रत्यक्षात आणल्या जातील.
पीएमपी बसच्या विविध अपघातांमध्ये ७ जणांचा बळी गेला आहे. तसेच काही किरकोळ अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची संख्याही जास्त आहे. तसेच कात्रज बसस्थानकात झालेल्या अपघातामुळे पीएमपीने मार्गावर आणलेल्या जुन्या बसेसमुळे प्रशासनावर टीका झाली. जुन्या बसेसमुळेच अपघात होत असल्याची ओरड सध्या होत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दुरुस्त केलेली प्रत्येक बस आरटीओच्या तपासणीनंतरच मार्गावर आणण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना डॉ. परदेशी म्हणाले, प्रवाशांची धावपळ व गोंधळ रोखण्यासाठी कात्रज, स्वारगेट व मनपा बसस्थानकांवर स्पीकरद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांत इतर मुख्य स्थानकांवर ही सुविधा केली जाईल. सर्व चालकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बस आगारातून बाहेर पडण्यापूर्वीच ब्रेकसाठी एअरप्रेशर, हँडब्रेक तसेच अन्य प्राथमिक गोष्टी नीट असल्याची खात्री केली जाईल. चालकांवर नियंत्रणासाठी ‘चालक तपासणी पथक’ तयार करण्यात येईल. तिकीट तपासणिसाप्रमाणे हे पथक चालकांचे बसचालन कौशल्य, बसथांब्यावर थांबणे, बसचा वेग, ब्रेक, गिअरचा वापर या गोष्टींवर लक्ष ठेवेल. त्यानुसार चालकांचा स्वतंत्र अहवाल तयार करून संबंधितांना प्रशिक्षण किंवा इतर उपाययोजना केल्या जातील. दि. १९ ते २२ मार्च या कालावधीत सर्व बसेसची ब्रेक सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यातील ५ बसमध्ये दोष आढळून आला असून, त्या मार्गावरून काढण्यात आल्या आहेत. सर्व बसेसची सर्व प्रकारची तपासणी करून घेणार आहे. गॅरेज व वर्कशॉप सुपरवायझर प्रत्येक बसची पडताळणी नोंद ठेवतील. चालकांच्या ट्रॅक रेकॉर्डनुसार त्यांना रिफ्रेशर कोर्स दिला जाईल. सर्व बसना मागे रिफ्लेक्टर बसविण्यात येतील, असे डॉ. परदेशी यांनी सांगितले.



पुणे व पिंपरी चिंचवडमधील मोठ्या २० बसस्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘बस बे’ तयार केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांची मदत घेतली जाईल. बसस्थानकाभोवती बॅरिकेड्स लावून बस बे तयार केला जाईल. तसेच आसपासचे अतिक्रमणही हटविले जाईल. याबाबत वाहतूक उपायुक्तांशी चर्चा झाली असून, पुढील दोन आठवड्यांत कार्यवाही होईल, असे डॉ. श्रीकर परदेशी यांनी नमूद केले.

आगार, बसस्थानकांचे ‘सेफ्टी आॅडिट’
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व १० आगार व प्रमुख १२ बसस्थानकांचे सेफ्टी आॅडिट करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंंडळाने (पीएमपी) घेतला आहे. कात्रज बसस्थानकात झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती पीएमपीचे प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी सोमवारी दिली.
कात्रज बसस्थानकात झालेल्या बस अपघातात दोघांचा बळी गेला होता. त्यानंतर पीएमपीने केलेल्या पाहणीत हा अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. बसस्थानकाची भौगोलिक स्थितीही त्यास कारणीभूत असल्याचे पाहणीनंतर निदर्शनास आले. याचा उल्लेख करून डॉ. परदेशी म्हणाले, की कात्रज बसस्थानकासमोर उतार असल्याने दुर्दैवाने ब्रेक निकामी झाल्यास ती बस थेट उताराने खाली येऊ शकते. त्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही वरिष्ठ चालक तेथील बस वाहतुकीवर लक्ष देण्यासाठी नेमण्यात आले आहेत. आठवडाभरात वर्तुळाकार पद्धतीने बस पुढे जातील, जेणेकरून उताराच्या दिशेने त्या उभ्या राहणार नाहीत. तसेच बसस्थानकाच्या मागे असलेल्या जागेची महापालिकेकडे मागणी केली जाणार आहे. याअनुषंगाने पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व १० आगार व प्रमुख १२ बसस्थानकांचे येत्या सोमवारपासून सेफ्टी आॅडिट केले जाणार आहे. त्यासाठी वर्कशॉप सल्लागारांच्या नेतृत्वाखाली तीन जणांची टीम नेमण्यात आली आहे. ही टीम सर्व आगार व १२ बसस्थानकांची पाहणी करेल. त्यांच्या भौगोलिक रचना, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांची सुरक्षितता, बसवाहतूक अशा विविध बाबींचा अभ्यास केला जाईल. त्याचा अहवाल तयार करून त्यानुसार प्रत्यक्ष उपाययोजना केल्या जातील, असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले.

... तर जूनपर्यंत
धावेल बीआरटी
नगर रस्ता, विश्रांतवाडी - आळंदी आणि औंध - रावेत या मार्गांवर बीआरटी प्रस्तावित आहे. या तीनही मार्गांवर आयटीएमएस सिस्टीम कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सिस्टीम सुरू केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने या मार्गावर पालिकेला उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जूनपर्यंत बीआरटी सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे डॉ. श्रीकर परदेशी यांनी सांगितले.
 

 

Web Title: PM to save the accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.