पंतप्रधान पीकविमा योजना: शेतकऱ्यांच्या खात्यांवर उद्या जमा होणार ९२१ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 07:24 IST2025-08-10T07:24:02+5:302025-08-10T07:24:44+5:30
खरीप, रब्बीतील रखडलेले दावे निकाली

पंतप्रधान पीकविमा योजना: शेतकऱ्यांच्या खात्यांवर उद्या जमा होणार ९२१ कोटी
पुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेतील गेल्यावर्षीचे खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. त्यात खरिपातील नुकसानभरपाई ८०९ कोटी, तर रब्बीतील ११२ कोटी रुपये असे एकूण ९२१ कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
यापूर्वी पीकविम्याची नुकसानभरपाई कंपन्यांकडून त्या-त्या वेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती; मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसानभरपाईचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याचा शुभारंभ करतील. त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्यात ‘डीबीटी’द्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल.
राजस्थानमधील झुंझुनूत होणार मुख्य कार्यक्रम
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आता ही एकूण ९२१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘डीबीटी’ने जमा केली जाणार आहे.
नुकसानभरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा....
नुकसानभरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांना चांगली नुकसानभरपाई मिळाली.या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचीही नुकसानभरपाई प्रलंबित होती. राज्य सरकारने १ हजार २८ कोटी रुपयांचा हा हप्ता १३ जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला.
त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या हंगामात ९५ लाख ६५ हजार अर्जदार शेतकऱ्यांना ४ हजार ३९७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी ८० लाख ४० हजार शेतकऱ्यांना ३ हजार ५८८ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते. तर १५ लाख २५
हजार शेतकऱ्यांना ८०९ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते.