शिवनेरीवर प्लास्टिक बंदी; सगळ्या गडांवर कधी होणार?

By श्रीकिशन काळे | Published: March 25, 2024 04:15 PM2024-03-25T16:15:01+5:302024-03-25T16:53:23+5:30

पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, येत्या ५ जूनपासून तर पाण्याची प्लास्टिकची बाटली देखील बंद करण्यात येणार

Plastic ban on Shivneri When will all the forts | शिवनेरीवर प्लास्टिक बंदी; सगळ्या गडांवर कधी होणार?

शिवनेरीवर प्लास्टिक बंदी; सगळ्या गडांवर कधी होणार?

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी करण्यात आली. त्याला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, येत्या ५ जूनपासून तर पाण्याची प्लास्टिकची बाटली देखील बंद करण्यात येणार आहे. सध्या उन्हाळा असल्याने पाण्याची बाटली ५० रूपये अनामत ठेवून वरती नेण्यास परवानगी आहे. असाच उपक्रम इतर किल्ल्यांवरही कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्लास्टिकचा कचरा गडांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. त्यासाठी काही संस्था काम देखील करत होत्या. याविषयी ‘ट्रॅश टॉक’ ग्रुपच्या वतीने सात-आठ वर्षांपासून गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविली जात होती. त्यासाठी या ग्रुपचे प्रमुख केदार पाटणकर यांनी सातत्याने सरकारकडेही पाठपुरावा केला होता. आज शिवनेरी या गडावर आता प्लास्टिक बंदीला सुरवात झाली आहे.

वन विभागाच्या वतीने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. गडावर शुध्द पाणी मिळावे म्हणून पाच ठिकाणी आरओ फिल्डरची सोय वन विभागाने केली आहे. स्वच्छ व शुध्द पाणी मुबलक देण्यासाठी संपूर्ण व्यवस्था गडावर आहे. जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी हा नियम जागतिक वन दिनानिमित्त २२ मार्चपासून लागू केला आहे. त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आता इतर किल्ल्यांवरही अशीच सोय करावी, अशी मागणही जोर धरत आहे.

किल्ले शिवनेरी

दि. २२ मार्च

-आजची एकूण पर्यटक संख्या:- २७८
- बॉटल संख्या: ६६
- ६६ पैकी २ बॉटल परत आल्या नाही
- २ बाटल्याचे १०० रुपये जमा
- २० पुड्या तंबाखू जप्त केल्या

दि. २३ मार्च

- एकूण पर्यटक संख्या ५५१

- एकूण बॉटल संख्या १६६
- पर्यटकांनी सर्व बॉटल परत आणल्या
- तंबाखू पुड्या ६ जप्त केल्या

५० रूपये अनामत रक्कम

पर्यटकांनी पाण्याची प्लास्टिकची बॉटलील गडावरून परत येताना खाली आणावी म्हणून त्याबद्दल्यात ५० रूपये अनामत रक्कम घेतली जाते. बाटली परत आणल्यानंतर ती रक्कम त्यांना परत दिली जाते. ही व्यवस्था ५ जून २०२४ जागतिक पर्यावरण दिनापर्यंत असणार आहे. त्यानंतर ५ जूनपासून शिवनेरीवर संपूर्णपणे प्लास्टिक बंदी असेल. पाण्याची बाटली देखील वरती नेता येणार नाही.

आठ वर्षांपासून गडावर स्वच्छता मोहिम राबवितो. सातत्याने पाठपुरावा केला असल्याने आता कुठे शिवनेरीपासून प्लास्टिक बंदीला सुरवात झाली आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू आहे. इतर किल्ल्यांवरही असाच नियम लागू करणे आवश्यक आहे. - केदार पाटणकर, प्रमुख, ट्रॅश टॉक ग्रुप

Web Title: Plastic ban on Shivneri When will all the forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.