पालिका घेणार ‘एचए’ची जागा
By Admin | Updated: June 11, 2017 03:52 IST2017-06-11T03:52:09+5:302017-06-11T03:52:09+5:30
पिंपरीतील हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीची ५९ एकर जागा सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार आहे.

पालिका घेणार ‘एचए’ची जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरीतील हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्स (एचए) कंपनीची ५९ एकर जागा सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार आहे. त्यानुसार ही जागा बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. त्यासाठी कलम ३७ नुसार जागेच्या वापरात फेरबदल करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २० जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पिंपरी येथे एचए कंपनीची सुमारे ७० एकर जागा आहे. दरम्यान, कंपनी तोट्यात असल्याने या जागेची विक्री करून त्यातून मिळालेल्या पैशातून कंपनी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जागा विकण्यासाठी कंपनीने सरकारची २००१ मध्ये परवानगी घेतली आहे. त्यानुसार सुमारे ७० एकरपैकी ५९ एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांना योग्य वाटतील, अशा अटी व शर्तीवर विकण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
एचए कंपनीची ५९ एकर जागा शहरातील नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्याचप्रमाणे ५९ एकर जागेच्या १० टक्के क्षेत्रावर महापालिकेची प्रशासकीय इमारत, सभागृह, उपहारगृह, दुकाने, गाळे, स्वच्छतागृह, गेस्ट हाऊस, कर्मचारी वसाहत, अग्निशामक केंद्र, एटीएम केंद्र, तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र, व्यायामशाळा, वाचनालय आदींसाठी सोयीसुविधा उभारता येतील, असे प्रस्तावात नमूद आहे.
दरम्यान, एचएच्या ५९ एकर जागेवर बहुउद्देशीय सार्वजनिक मैदानाचे आरक्षण टाकण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्याचा तसेच जिल्हाधिकारी ठरवतील त्या अटी व शर्तीस अधीन राहून भूसंपादन खर्च अदा करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. एच. ए. च्या जागेवर मोठ्याप्रमाणात बांधकाम व्यावसायिकांनी राडारोडा टाकला आहे. भविष्यात अतिक्रमण होण्याचीही शक्यता आहे.
- एचए कंपनीची ५९ एकर जागा शहरातील नागरिकांच्या सार्वजनिक सुविधांसाठी घेण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. ही जागा मंजूर विकास योजनेत बहुउद्देशीय सार्वजनिक मैदान म्हणून आरक्षित केल्यास नागरिकांना विविध सोयीसुविधा निर्माण करता येणार आहेत.
- प्रदर्शन भरविणे, सर्कस, विविध उपक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक, व्याख्यानमाला, राजकीय सभा, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, स्नेहसंमेलन, वाहनतळ, हेलिपॅड आदींसाठी या जागेचा उपयोग करता येईल, असे प्रस्तावात म्हटले आहे.
- ५९ एकर जागेच्या १० टक्के क्षेत्रावर महापालिकेची प्रशासकीय इमारत, सभागृह, उपहारगृह, दुकाने, गाळे, स्वच्छतागृह, गेस्ट हाऊस, आदींसाठी सोयीसुविधा असतील.