पिंपरी : जिल्ह्यातील प्रमुख सरकारी रुग्णालय असलेल्या सांगवी परिसरातील औंध जिल्हा रुग्णालयात वर्षभरापासून ‘एमआरआय’ (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) मशीन उपलब्ध नाही. ‘एमआरआय’ सेवा पुरवण्याबाबत खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे; मात्र त्या संस्थेने सेवा सुरू केलेली नाही. त्यामुळे शेकडो रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये महागड्या तपासण्या कराव्या लागत आहेत.मेंदूच्या दुखापती, ट्यूमर, पाठीच्या मणक्याच्या समस्या आणि सांधेदुखी यांसारख्या विविध आजारांचे निदान करण्यासाठी ‘एमआरआय’ तपासणी महत्त्वाची असते. मात्र, जिल्हा रुग्णालयात एमआरआय सुविधा नसल्याने रुग्णांना आठवडे थांबावे लागत आहे किंवा जास्त गर्दीच्या इतर सरकारी रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये एमआरआय तपासणीची किंमत चार हजार ते १२ हजार रुपये इतकी असून, ती अनेक रुग्णांना परवडत नाही.
शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये ‘युनिक वेलनेस’ या खासगी संस्थेला जिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन आणि एमआरआय सेवा पुरवण्यासाठी नियुक्त केले होते. करारानुसार, खासगी संस्थेला रुग्णालयात ठराविक जागा देण्यात आली होती आणि सहा महिन्यांत या सेवा सुरू होणे अपेक्षित होते; मात्र ऑगस्ट २०२४ मध्ये केवळ सीटी स्कॅन सेवा सुरू झाली असून, एमआरआय सेवा अद्यापही सुरू झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी १७ जुलै २०२५ रोजी खासगी संस्थेला पत्र लिहून फेब्रुवारी २०२५ पासून एमआरआय सेवा सुरू न झाल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. डॉ. यमपल्ले यांनी सांगितले की, रुग्णांनी एमआरआय सुविधेबद्दल तक्रार केल्यास, रुग्णालय प्रशासन खासगी संस्थेच्या औंध येथील केंद्रात एमआरआय तपासणी करण्याची व्यवस्था करते. यासाठी वाहतूक आणि मनुष्यबळ रुग्णालय पुरवते. तरीही, यामुळे रुग्णांचा वेळ आणि संसाधनांचा अपव्यय होतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वेळेवर एमआरआय सुविधा न मिळाल्याने स्ट्रोक, ट्यूमर आणि अंतर्गत दुखापतींच्या निदानात विलंब होऊ शकतो, विशेषतः गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे धोका वाढू शकतो. दररोज एक हजार बाह्यरुग्ण
जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज सुमारे एक हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी येतात आणि रुग्णालयात ३०० खाटांची क्षमता आहे. याशिवाय, दररोज १०० हून अधिक रुग्ण विविध विभागांमध्ये दाखल होतात. काही रुग्णांना एमआरआय तपासणीची गरज असते आणि ‘ऑर्थो ओपीडी’च्या दिवशी ही संख्या आणखी वाढते. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांमधून गंभीर आजार असलेले रुग्ण जिल्हा रुग्णालयाकडे पाठवले जातात.
एमआरआय सेवा सुरू करण्यासाठी ठरलेली सहा महिन्यांची मुदत फेब्रुवारीमध्ये संपली. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत खासगी संस्थेला पत्रव्यवहार करण्यात आला असून, याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे. - डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सकगरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी असलेल्या जिल्हा रुग्णालयात अशा महत्त्वाच्या तपासणी सुविधेचा अभाव आहे. यामुळे रुग्णालयाचा उद्देशच हरवतो. प्रत्येक रुग्ण जिल्हा शल्यचिकित्सकांकडे जाऊन मदत मागत नाही. रुग्णालयातील कर्मचारी फक्त एमआरआय सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगतात. रुग्णांना दुसरीकडे पाठवण्यासाठी वाहनेही पुरवली जात नाहीत. - शरत शेट्टी, आरोग्य कार्यकर्ते