पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडीदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वाहतूक जलदगतीने व्हावी यासाठी या मार्गावर समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) असून, त्यातील खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने मंगळवारी (दि.२४) या ग्रेड सेपरेटरची पाहणी केली असता तब्बल ८२ खड्डे आढळले आहेत. यामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी होत असून अपघातही घडत आहेत.
पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी व सायंकाळी वाहनांमध्ये आणखी भर पडते. बहुतांश रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. पुण्याहून निगडीच्या दिशेने येताना हॅरिस पूल ओलांडल्यानंतर फुगेवाडी मेट्रो स्थानकाखालील रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्डे समजत नाहीत. त्यात वाहने आदळतात. वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. नाशिक फाट्याच्या पुढे निगडीकडे जाणाऱ्या सेवारस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. या परिसरात रस्ता अरुंद आहे. त्यातच परिसरातील दुकानदारांच्या गाड्या रस्त्यालगतच उभ्या असतात. शिवाय खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते.
दोन्ही बाजूंच्या मार्गावर ८२ खड्डेनिगडीकडून दापोडीकडे जाणाऱ्या ग्रेडसेपरेटरमधील मार्गावर ४४ खड्डे आढळून आले, तर दापोडीकडून निगडीकडे जाणाऱ्या दुसऱ्या मार्गावर ३८ खड्डे आढळून आले. चिंचवड, पिंपरी येथील अंडरपासमधील खड्ड्यांमुळे नेहमी वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय या अंडरपासची उंची कमी असल्याने त्यामध्ये अवजड वाहने अडकून पडत आहेत.
बीआरटी मार्गिकेतही खड्डेया ग्रेड सेपरेटरला लागून असलेल्या बीआरटी मार्गिकेतही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. चिंचवड स्टेशन, आकुर्डी, निगडी येथील मार्गिकेत मोठे खड्डे आहेत. यामुळे बसचालकांना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात बस आदळून बसमधील प्रवाशांचेही हाल होत आहेत.
दुचाकीचालक कोलमडून पडतात रस्त्यावरखड्डे इतके आहेत की, त्यामधून मार्ग काढणे दुचाकी चालकांना शक्य होत नाही. खड्ड्यात दुचाकी आदळून दुचाकीचालक अक्षरशः कोलमडून रस्त्यावर पडतात. यामध्ये चालक जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
सकाळी आणि सायंकाळी कोंडी नित्याचीपुण्याहून निगडीकडे येताना खडकीपर्यंत वाहतूक कोंडी असते. पूल ओलांडल्यावर या कोंडीतून सुटका होईल, असे वाहन चालकांना वाटते. मात्र, पूल ओलांडताच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी ही कोंडी नित्याची बनली आहे. एनएचएआय, महापालिका आणि मेट्रोच्या कचाट्यातच रस्ता
हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून जातो. रस्त्याची निर्मिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) वतीने करण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून वेळोवेळी देखभाल-दुरुस्ती होत नसल्याचे कारण देत महापालिकेने देखभाल-दुरुस्ती स्वत:कडे घेतली. त्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येते. मात्र, आधी बीआरटी, त्यानंतर मेट्रो आणि जलवाहिनीच्या कामांमुळे हा रस्ता वारंवार खोदण्यात येत आहे.
विनाअडथळा प्रवास गेला कुठे?पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्याकडे विनाअडथळा जाता यावे म्हणून या ग्रेड सेपरेटरची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आता मेट्रो, बीआरटीच्या कामांमुळे यावर अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे विनाथांबा, विनाअडथळा जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या या ग्रेड सेपरेटरच्या मूळ उद्देशालाच प्रशासनाकडून हरताळ फासला जात आहे.
निगडी-दापोडी ग्रेडसेपरेटरमधील खड्डे महापालिकेकडून वारंवार बुजविण्यात येत आहेत. सध्या पावसाळा आहे. पाऊस थांबला की खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात येईल. - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका