पिंपरी : आखाती युद्धामुळे देशात निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा बेकरी उद्योगाला जबर फटका बसला आहे. गॅसच्या अभावामुळे पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के बेकऱ्या पूर्णपणे बंद पडल्या आहेत. उर्वरित ३० टक्के बेकऱ्या लाकूड भट्ट्यांवर सुरू आहेत. त्यामुळे चहासोबत पाव-बिस्किट आता विसरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास हा व्यवसाय कोलमडण्याची भीती बेकरी व्यावसायिकांनी व्यक्त केली.
पूर्वी बेकरी व्यवसायात लाकडाच्या भट्ट्यांचा वापर केला जात होता. परंतु, प्रदूषणाच्या दृष्टीने महापालिकांनी गॅस व इलेक्ट्रिक यंत्रणांचा वापर करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून बेकरी व्यावसायिकांनीही गॅस आणि इलेक्ट्रिक प्रणालीकडे वळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुमारे ७० टक्के बेकऱ्यांनी बदल केला होता. मात्र, सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने या सर्व बेकऱ्या बंद पडल्या आहेत. फक्त लाकडाच्या भट्ट्यांचा वापर करणाऱ्या बेकऱ्या सुरू आहेत.
गॅस उपलब्ध नसल्यामुळे उत्पादन पूर्णपणे थांबले असून, अनेक कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. बेकरी व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढला असून, व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे. उत्पादन घटल्याने बाजारातील बेकरी पदार्थांच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
दरवाढीबाबत लवकरच बैठक
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात बेकरी प्रोडक्शन वेलफेअर असोसिएशनच्या सदस्य असलेल्या ८५० तर जिल्ह्यात ८९ बेकऱ्या आहेत. वाढत्या खर्चामुळे सध्याच्या दरात व्यवसाय करणे शक्य नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर असोसिएशनची लवकरच बैठक होणार असून, त्यात नवे दर आणि वजनाबाबत निर्णय होणार आहे.
केंद्र सरकारकडून गॅसटंचाईची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बेकरी व्यावसायिकांनी संयम राखावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅसपुरवठा सुरळीत झाल्यास बेकरी उद्योग पुन्हा पूर्ववत होईल. लाकडी भट्ट्यांच्या वापराबाबत महापालिका अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू आहे. - सैदुद्दीन अन्सारी, अध्यक्ष, बेकरी प्राॅडक्शन वेल्फेअर असोसिएशन.
सध्या एकच गॅस सिलिंडर शिल्लक आहे. त्यामुळे क्रिमरोल, बिस्किट, खारी, असे कमी गॅस लागणारे पदार्थ तयार केले जात आहेत. होलसेल विक्री बंद आहे. गॅस संपल्यानंतर बेकरी बंद करावी लागणार आहे. -आसिफ शेख, बेकरी व्यावसायिक, दापोडी.
Web Summary : Gas shortages caused by the Gulf War have forced 70% of bakeries in Pimpri-Chinchwad to close. Remaining businesses use wood, raising prices and threatening livelihoods. A bakery association meeting will soon address rising costs.
Web Summary : खाड़ी युद्ध के कारण गैस की कमी से पिंपरी-चिंचवड में 70% बेकरियाँ बंद हो गईं। शेष व्यवसाय लकड़ी का उपयोग करते हैं, जिससे कीमतें बढ़ रही हैं और आजीविका खतरे में है। बेकरी संघ की बैठक जल्द ही बढ़ती लागतों पर विचार करेगी।