दागिने पॉलिश करून घेताय... सावधान!
By Admin | Updated: February 3, 2017 04:02 IST2017-02-03T04:02:59+5:302017-02-03T04:02:59+5:30
शिरुर, खेड पाठोपाठ आता मंचरमध्येदेखील दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबवण्याची घटना उघड झाली आहे. त्यामुळे या मागे एखादी मोठी टोळी असण्याची

दागिने पॉलिश करून घेताय... सावधान!
मंचर : शिरुर, खेड पाठोपाठ आता मंचरमध्येदेखील दागिने पॉलीश करण्याच्या बहाण्याने दागिने लांबवण्याची घटना उघड झाली आहे. त्यामुळे या मागे एखादी मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मंचर येथे
तीन महिलांची अशाचपद्धतीने फसवणूक करून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
निघोटवाडी गावच्या लांडकमळा येथे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघा चोरट्यांनी तीन महिलांचे दागिने लांबविले. ही घटना काल दुपारी घडली. या संदर्भात मंचर पोलिसांत तक्रार अर्ज देण्यात आली आहे.
निघोटवाडी गावच्या दक्षिणेला लांडकमळा वस्ती आहे. काल दुपारी मोटार सायकलवरून दोन तरुण आले. ते हिंदीमध्ये बोलत होेते. खंडू बबन निघोट यांच्या घराजवळ तरुण थांबले. आम्ही कंपनीकडून आलो आहे. पावडरची जाहिरात करण्याचे काम आम्ही करतो. ही पावडर तुम्ही वापरा, असा आग्रह त्यांनी केला. घरात पुरुष मंडळी नव्हती. शेजारी शेजारी राहणाऱ्या धनश्री निघोट, कांताबाई निघोट व मंदा खंडू निघोट या तीन महिला तेथे जमल्या. या तरुणांनी त्यांना बोलून फसवले. सुरुवातीला तांब्याची भांडी आणावयास सांगितली. पावडर पाण्यात मिसळून त्यात गडू, ताम्हण धुतले असता ते स्वच्छ निघाले. त्यामुळे महिलांचा विश्वास बसला.
मग आम्ही दागिने पॉलिश करतो. दागिने असेल तर पॉलिश करून घ्या, असे तरुण म्हणाले. महिलांनी दागिने देण्यास नकार दिला. तेव्हा देवसुध्दा उजळुन देतो असे त्यांनी सांगितले. धनश्री निघोट हिच्या पायात पैंजण होते. ट्रायल म्हणून त्यांनी धनश्रीचे पैंजण घेतले. खिशातून रूमाल व सोबत सफेद डबी काढून मिश्रण केले. त्यात पैंजण धुवुन देण्यात आले. पैजंन लख्ख झाले. त्यामुळे महिलांना हे तरूण नक्कीच कंपनीचा प्रचार करण्यासाठी आले आहेत असे वाटले. या दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या भामाबाई राजगुरू व जनाबाई भेके या महिला तेथे थांबल्या त्यावेळी त्यांनाही दागिने द्या असे दोघांनी सांगितले.
यावेळी दोन्ही तरूणांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कांताबाई निघोट हिने एक तोळा वजनाचे गंठण, धनश्री निघोट हिने दीड तोळ्याचे मंगळसूत्र व कानातील पाऊण तोळयाचा दागीना, मंदा निघोट यांनी सोन्याचे गंठण पॉलीश करण्यासाठी दिले. चोरट्यांनी पावडरचे मिश्रण केले त्यात हे दागिने टाकले. दागिने बाहेर काढू नका, असे सांगून दोघे अर्ध्या तासात येतो, असे सांगुन परिसरात फिरून आले.
यादरम्यान त्यांनी इतर काही घरांचा अंदाज घेतला. दोघे तरूण पुन्हा आले. त्यानंतर आतील दागिने पेपरवर ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांनी हे दागिने डब्यात झाकुन ठेवले. धनश्रीला घरातून हळद आणण्यास सांगण्यात आले.
डबा लगेच उघडू नका, अशी सूचना दोघांनी केली. हळद आणण्यास महिला गेल्याचे पाहून दोघांनी तेथून दागिने घेवून धूम ठोकली. (वार्ताहर)
शिरूरमध्येही अशीच चोरी
1 शिरूरमध्येदेखील गेल्या आठवड्याभरापूर्वी अशाच स्वरूपाची घटना घडलेली होती. त्यामध्ये देखील एका महिलेचे मंगळसूत्र लांबवलेले होते. जाधवमळा येथे पॉलिश करण्याच्या बहाण्यानेच हे तरुण तिथे घुसले होते.
2डिटर्जंट पावडर विकण्याचे कारण दाखवले व डब्यात घालून पाण्यात गरम करून आणण्यास सांगितले. पंधरा मिनिटांनी डबा उघडण़्यास सांगितले तेव्हा डबा रिकामा होता. मंचरमध्ये घडलेल्या घटनेचे साधर्म्य दिसून येत आहे. अशीच घटना काही दिवसांपूर्वी खेडमध्ये देखील याच पद्धतीने घडली आहे.
पोलीस गस्त घालणार
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून तसेच लक्ष विचलित करून दागिने लुटण्याचा प्रकार घडला आहे. खेडेगावात असे प्रकार घडतात. नागरिकांनी विशेषत: महिलांनी सतर्कता बाळगली पाहिजे. अनोळखी फिरते विक्रेते आले तर त्यांना घरात घेण्यास मज्जाव करावा. संशयित वाटल्यास पोलिसांना तत्काळ कळवावे. चोरट्यांना पकडण्यासाठी नागरिकांचीही सतर्कता आवश्यक आहे. अशी टोळी जिल्ह्यात कार्यरत असण्याची शक्यता आहे. या चोरट्यांना पकडण्यासाठी आता छोट्या गावांत तसेच खेडेगावात पोलीस दुपारच्या वेळी गस्त घालणार आहेत.
- सुनील गोडसे,
पोलीस निरीक्षक, मंचर