संचालक, साखर आयुक्तांविरोधात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2016 03:50 IST2016-01-14T03:50:17+5:302016-01-14T03:50:17+5:30

सोमेश्वर कारखान्याचे संचालक मंडळ, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांच्यासह लेखापरीक्षक यांना प्रतिवादी करून शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल

Petitioner against the Director, Sugar Commissioner | संचालक, साखर आयुक्तांविरोधात याचिका

संचालक, साखर आयुक्तांविरोधात याचिका

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखान्याचे संचालक मंडळ, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक यांच्यासह लेखापरीक्षक यांना प्रतिवादी करून शेतकरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी दिली.
यामध्ये सन २०१३-१४ व २०१४-१५ या दोन हंगामांतील थकीत एफआरपीबाबत संचालक मंडळाने फसवणूक केल्याचा आरोप काकडे यांनी केला आहे. काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, कारखान्याने २०१३-१४ची एफआरपी २,१३६ रुपये निश्चित करून त्याबाबत वार्षिक सभेत घोषणाही केली. शेतकरी कृती समितीने साखर आयुक्तांकडे दाद मागितल्यावर एफआरपी चुकीच्या तोडणी वाहतूक खर्चावर अधारित असल्याचे उघड झाले. त्यामुळे साखर आयुक्तांनी २,२५७ रुपये एफआरपी देण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे कारखाना सभासदांना अजून १२१ रुपये देणे लागत होता.
दरम्यान कारखान्याने विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून १०० रुपये सभासदांना दिले. मात्र, हे पैसे एफआरपीपोटी दिले की अन्य कोेणत्या कारणास्तव दिले, हे संधी देऊनही कारखान्याने स्पष्ट न केल्याने साखर आयुक्तांनी १२१ रुपये प्रतिटनाप्रमाणे सभासदांना पैसे अदा करण्याचा आदेश दिला. यामध्ये वेळ पडल्यास कारखान्याची मालमत्ता विकून उसाचे पैसे अदा करण्याचा आदेश होता. याविरोधात कारखान्याने न्यायालयात धाव घेतली आणि निर्णय न होईपर्यंत साखरविक्री करणार नसल्याचे बंधपत्र लिहून दिले. मात्र, या बंधपत्राचे उल्लघंन करून कारखान्याने साखरविक्री केली असल्याचे शेतकरी कृती समितीने न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. यावर न्यायालयाने ताशेरे ओढून साखर आयुक्तांनी आदेश दिलेली स्थगिती उठविली. यामुळे १२१ रुपये व त्यावरील व्याज देणे क्रमप्र्राप्त असताना कारखान्याने केवळ २१ रुपये व व्याज दिले. (वार्ताहर)

खोटी एफआरपी दाखवून सभासदांची फसवणूक
विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून दिलेले १०० रुपये हे एफआरपीचेच असल्याचा अहवाल कारखान्याने लेखापरीक्षकाकडून तयार करून घेतला. त्यामुळे साखर आयुक्तांनी १२१ ऐवजी २१ रुपये मान्य केले. त्यामुळे संचालकांनी साखर आयुक्त, प्रोदशिक सहसंचालक व लेखापरीक्षक यांच्याशी संगनमत करून खोटी एफआरपी दाखवून सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप काकडे यांनी प्रसिद्धिपत्रकात केला आहे.

Web Title: Petitioner against the Director, Sugar Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.