पाच हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ
By Admin | Updated: July 8, 2015 01:39 IST2015-07-08T01:39:20+5:302015-07-08T01:39:20+5:30
खेड तालुक्यात २०१४-२०१५ या वर्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ कोटी ३८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे,

पाच हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ
राजगुरुनगर : खेड तालुक्यात २०१४-२०१५ या वर्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ कोटी ३८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. एकूण साडेपाच हजार शेतकऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत प्रामुख्याने कृषी खात्याच्या वतीने जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक-कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरविला होता. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आणि जेव्हा झाला तेव्हा अवकाळी झाल्याने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण बहुतांश भात उत्पादकांनी विमा घेतला असल्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे.
भात पिकाला मिळालेल्या नुकसानभरपाईची रक्कम २ कोटी ३४ लाख आहे. इतर पिकांना त्या तुलनेत कमी नुकसानभरपाई मिळाली. गेल्या वर्षी एकूण १७ लाख ६५ हजार रुपये विम्याच्या हप्त्यापोटी भरले गेले होते. भाताला हेक्टरी १५ हजार ४०० रुपये विमा संरक्षण होते, तर हेक्टरी ३८५ रुपये विम्याचा हप्ता होता. प्रत्येक पिकाला वेगवेगळी विमा संरक्षण रक्कम असते. (वार्ताहर)स