जेधे चौकात पादचारी उपरे

By Admin | Updated: September 14, 2015 04:49 IST2015-09-14T04:49:03+5:302015-09-14T04:49:03+5:30

शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकात पादचारी उपरे ठरत आहेत. उड्डाणपुलांच्या कामांमुळे अरुंद झालेल्या चौकात पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चौक पार करावा लागत आहे

Pedestrians on the Jade Chowk | जेधे चौकात पादचारी उपरे

जेधे चौकात पादचारी उपरे

पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या स्वारगेट येथील जेधे चौकात पादचारी उपरे ठरत आहेत. उड्डाणपुलांच्या कामांमुळे अरुंद झालेल्या चौकात पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चौक पार करावा लागत आहे. पादचाऱ्यांना चौक ओलांडण्यासाठी असलेले १५ सेकंदही वाहने घुसखोरीमुळे अपुरे पडत आहेत.
सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, शिवाजी रस्ता आणि टिळक रस्ता... या चार प्रमुख रस्त्यांना जोडणारा जेधे चौक. एसटी तसेच पीएमपीच्या महत्त्वाच्या बसस्थानकांमुळे सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने या चौकाला आगळे महत्त्व आहे. याचबरोबर शहर मध्यवस्तीतील महत्त्वाचा चौक असल्याने सामान्य नागरिकांचीही सततची ये-जा असते. परिणामी वाहनांबरोबरच पादचाऱ्यांचाही कमालीचा बोजा पडत असतो. कोंडी फोडण्यासाठी नियोजन गरजेचे आहे. आठवडाभर येथील स्थितीचा लोकमत प्रतिनिधीने प्रत्यक्ष आढावा घेतला.
सातारा रस्ता, टिळक व शिवाजी रस्त्याकडून सारसबाग रस्त्याकडे वळणाऱ्या वाहनांवर तर कसलेच नियंत्रण नाही. या रस्त्यांवरून वाहनांंची वर्दळ सातत्याने असते. त्यातच सातारा रस्त्याकडून वळणाऱ्या वाहनांना तीन व सहाआसनी रिक्षांना वळसा घालून पुढे जावे लागत आहे. या रिक्षा कशाही उभ्या केल्याने कोंडी अधिकच होते. त्यामुळे पादचाऱ्यांना चौकात जाण्यापूर्वी रिक्षा व इतर वाहनांचा सामना करावा लागत आहे.
पादचाऱ्यांच्या सिग्नलवरही अतिक्रमण
जेधे चौकात पादचाऱ्यांना चौक पार करण्यासाठी साधारण १५ सेकंदांचा वेळ देण्यात आला आहे. मात्र, या वेळेतही वाहनचालकांनी अतिक्रमण केल्याचे पाहायला मिळाले. पादचाऱ्यांना ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही वाहनचालकांची घुसखोरी सुरूच असते. तसेच पादचाऱ्यांना रेड सिग्नल मिळण्यापूर्वीच एका बाजूने वाहनचालक भरधावपणे वाहने दामटतात. यात ४-५ सेकंद सहजपणे निघून जातात. त्यामुळे अनेकदा वाहनांशी स्पर्धा करत पादचाऱ्यांना चौक ओलांडावा लागत आहे.
उड्डाणपुलाच्या कामात पादचारी दुर्लक्षित
चौकालगत सोलापूर रस्ता व सातारा रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू करताना पादचाऱ्यांचा कसलाही विचार करण्यात आलेला नाही. नेमका चौक ओलांडायचा कसा, हा प्रश्न पादचाऱ्यांसमोर असतो. अनेक वाहनचालक सिग्नल असलेल्या ठिकाणापासून पुढे वाहन उभे करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मध्य भागातूनच चौक पार करावा लागत आहे. पादचाऱ्यांसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

Web Title: Pedestrians on the Jade Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.