रुग्णाच्या नातेवाइकांची डॉक्टरला धक्काबुक्की
By Admin | Updated: July 17, 2015 03:44 IST2015-07-17T03:44:22+5:302015-07-17T03:44:22+5:30
मेंदूत गाठ झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया दोन वेळा पुढे ढकलली. तिसऱ्यांदा असाच प्रकार घडला. त्यामुळे रुग्णाच्या चिडलेल्या नातेवाइकांनी वायसीएम रुग्णालयाचे

रुग्णाच्या नातेवाइकांची डॉक्टरला धक्काबुक्की
पिंपरी : मेंदूत गाठ झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया दोन वेळा पुढे ढकलली. तिसऱ्यांदा असाच प्रकार घडला. त्यामुळे रुग्णाच्या चिडलेल्या नातेवाइकांनी वायसीएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ. अमित वाघ यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली. महापालिका वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डॉ. वाघ यांची भेट घेतली. धक्काबुक्की करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली आहे. डॉक्टरांवरील हल्याच्या घटनेचा विविध संंघटनांनी निषेध नोंदवला आहे.
आळेफाटा येथील रहिवासी असलेल्या गंगूबाई लक्ष्मण थोरात (वय ६५, रा. आळेफाटा) यांच्या मेंदूत गाठ झाली आहे. त्यांना १८ जून २०१५ला संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल करून घेतले. मात्र, वेळोवेळी विविध कारणे सांगून शस्त्रक्रियेसाठी विलंब करण्यात आला. गुरुवारी, १६ जुलैला सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया निश्चित झाली होती. परंतु, दुसऱ्याच रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी नेले. ही शस्त्रक्रिया का केली नाही, असे विचारण्यास गेलेल्या थोरात यांच्या नातवाइकांना डॉक्टरांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुुळे संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांंनी डॉक्टर वाघ यांना धक्काबुक्की केली. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. रुग्ण महिलेचा मुलगा भीमा थोरात (वय ४०) यांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केली. डॉक्टरांकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. वारंवार विनंती करूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे हा प्रकार घडला, असे रुग्ण महिलेची मुलगी सुवर्णा घागरे यांनी सांगितले.
या घटनेनंतर महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, तसेच वैद्यकीय अधीक्षक मनोज देशमुख, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी त्वरित वायसीएमला भेट दिली. डॉ. वाघ यांच्याशी चर्चा करून झालेल्या घटनेची माहिती घेतली.
(प्रतिनिधी)
आरपीआयचे अजिज शेख, सामाजिक कार्यकर्ते भीमराव तुरुकमारे, श्याम उनवणे, सिद्धार्थ निंबाळकर यांनी डॉक्टरवरील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. वासीएमचे डॉक्टर काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार असल्याचे निवेदन वैद्यकीय विभागाने दिले आहे.