पासपोर्टची माहिती लपविणे महागात

By Admin | Updated: August 19, 2015 00:19 IST2015-08-19T00:19:04+5:302015-08-19T00:19:04+5:30

पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना सध्याचा राहता पत्ता न देता फक्त गावाकडचा पत्ता देणे, गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती न देणे, पूर्वी

Passport information hidden in the expensive | पासपोर्टची माहिती लपविणे महागात

पासपोर्टची माहिती लपविणे महागात

दीपक जाधव, पुणे
पुणे : पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना सध्याचा राहता पत्ता न देता फक्त गावाकडचा पत्ता देणे, गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती न देणे, पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केलेला असतानाही त्याची माहिती न भरणे अशा विविध प्रकारे माहिती लपविणे अर्जदारांना चांगलेच महागात पडत आहे. माहिती लपविणाऱ्या अर्जदारांकडून दररोज सरासरी ७० हजार ते एक लाखापर्यंतचा दंड वसूल केला जात आहे.
पुणे पासपोर्ट विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या ६ जिल्ह्यांचा समावेश होतो. पुणे विभागाकडे पासपोर्टसाठी दररोज आॅनलाइन दीड हजार अर्ज येतात. अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळून आल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने दंडात्मक कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केलेली आहे. मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयामध्ये अनेक प्रकारच्या चाळण्या लावून अर्जात भरलेली माहिती तपासून पाहिली जाते. त्यामुळे चुकीची माहिती भरल्याचे किंवा माहिती लपविल्याचे लगेच स्पष्ट होत आहे.
माहिती लपविणाऱ्या या अर्जदारांना ५ हजार रुपये दंड आकारला जातो. पासपोर्ट हा नागरिकत्वाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा असल्याने अर्जदारांकडून पासपोर्ट कार्यालयाची दिशाभूल होऊ नये, म्हणून ही कठोर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये चुकीची माहिती भरल्याप्रकरणी २० कोटीपेक्षा जास्त रकमेचा दंड पासपोर्ट कार्यालयाकडे जमा झाला आहे.
आॅनलाइन अर्ज भरताना पोलीस व्हेरिफिकेशन टाळण्यासाठी सध्याचा पत्ता न देता केवळ कायमस्वरूपी पत्ता देण्याचे प्रमाण मोठे आहे. अर्जदारांवर गुन्हे दाखल नसतानाही केवळ दोन-दोन ठिकाणचे पोलीस व्हेरिफिकेशन टाळण्यासाठी एकच पत्ता दिला जातो. मात्र पोलीस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया आता गतिमान करण्यात आल्याने त्याचा कालावधी खूपच कमी झाला आहे.
पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज भरलेला असतानाही त्याची माहिती न देता दुसरा अर्ज भरला जातो. पासपोर्ट कार्यालयाने अर्जाबाबत काही आक्षेप घेऊन पासपोर्ट वितरीत न केल्यास पुन्हा नव्याने अर्ज भरून पासपोर्ट भरण्याचा प्रयत्न अर्जदारांकडून केला जातो. आॅनलाइन पद्धतीमुळे हा प्रकार लगेच उजेडात येतो. त्यामुळे अर्जदारांनी नवीन अर्ज न भरता जुन्या अर्जातील आक्षेप दूर करून पासपोर्ट मिळविणे सोयीस्कर ठरू शकणार आहेत. पासपोर्ट कार्यालयाच्या संकेतस्थळावर अर्ज कसा भरावा, याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. मात्र ती न वाचताच अर्ज भरल्याने अनेकदा चुका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रोज ४० ते ५० जणांवर कारवाई...
माहिती लपविल्याचे निदर्शनास आल्यानंतर अर्जदाराकडून खुलासा मागविला जातो. समाधानकारक खुलासा न केल्यास त्याला ५ हजार रुपये दंड आकारला जातो. विद्यार्थ्यांना ५०० रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे दररोज ४० ते ५० जणांकडून दंडवसुली केली जात आहे.

Web Title: Passport information hidden in the expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.