पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 03:05 PM2018-09-04T15:05:04+5:302018-09-04T15:44:38+5:30

बारामती येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार यांनी अापला पासपाेर्ट काढतानाच्या अाठवणी सांगितल्या.

Passport ... Egypt and Sharad Pawar | पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार

पासपोर्ट... इजिप्त आणि शरद पवार

बारामती : पासपोर्ट काढताना उडालेली धांदल... इजिप्तचा प्रवास... आणि शरद पवार... अशा त्रिकोणातील हास्यभरले किस्से उलगडले स्वत: माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांनी. पासपोर्ट काढण्यापासून ते परदेशवारी करुन परत येईपर्यंत असलेली धाकधूक, इंदिरा गांधींनी दौऱ्यासाठी दिलेली संधी आणि पोलिसांच्या अहवालाला लागलेला उशीर असे सर्व अनुभव ऐकताना उपस्थितांचीही उत्सुकता ताणली जात होती. बारामती येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी  ‘दिलखुलास’ पवार सर्वांना अनुभवायला मिळाले. 

    पवार म्हणाले, मी १९६२ साली पहिला पासपोर्ट काढला. आंतरराष्ट्रीय बैठकीसाठी इजिप्त येथे जाण्यासाठी माझी त्यावेळी इंदीरा गांधी यांनी निवड केली होती. जगातील ९० देशांचे तरुण त्या बैठकीला उपस्थित राहणार होते. नारायण दत्त तिवारी यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासह जाफर शरीफ आदी सदस्य त्या बैठकीला उपस्थित होतो. आयुष्यात पहिल्यांदाच त्यावेळी परदेशवारीला निघालो होतो. त्यावेळी पासपोर्टचे वरळी येथे कार्यालय होते. पुण्यात देखील पासपोर्टचे कार्यालय नव्हते. पासपोर्टचा अर्ज घेऊन त्यासाठी बारामती-पुणे-मुंबई असा प्रवास  केला. कार्यालयात जाऊन तेथे अर्ज दिला. त्यावर एक महिन्यानंतर या, पोलीस चौकशी करावी लागेल असे मला सांगण्यात आले. बरोबर एक महिन्यानंतर परत पासपोर्ट कार्यालयात गेलो. मात्र, तुमचा पुणे ग्रामीण पोलिसांचा अहवाल अद्याप आलेला नाही, परत या असे सांगण्यात आले. दीड महीन्यांनंतरही तेच उत्तर मिळाले. 

    अखेर दोन महिन्यांनी माझा पासपोर्ट मिळाला. पासपोर्ट आल्यावर आपण काहीतरी कमविल्याचे समाधान मला मिळाले. त्यानंतर आम्ही इजिप्त येथील  ‘आस्वान’ धरणाच्या परीसरातील आयोजित बैठकीसाठी रवाना झालो. आमचे भाग्य म्हणजे त्या काळी गेलेल्या सर्वांना पुढे मुख्यमंत्री पदी काम करण्याची संधी मिळाली. इंदीरा गांधी यांनी माणसांची नेमकी निवड करण्याचा आदर्श पुढे ठेवल्याचे पवार म्हणाले. आज इथे सहज पासपोर्ट मिळत आहे. याबद्दल समाधानही व्यक्त केले.

...  ‘बंधूं’च्या पासपोर्ट बरोबर आम्ही फोटो काढले
१९६०- ६१ साली मी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. माझे मोठे बंधू माधवराव  पवार इंग्लंडला जायला निघाले होते. त्यावेळी आम्ही पवार कुटुंबिय बारामती शहरातील आमराईमध्ये रहायला होतो. इंग्लंडला जाण्यासाठी तीन आठवड्यांचा बोटीचा प्रवास होता. परदेशात  कसे जाणार, याबाबत आमच्या कुटुंबात आठ पंधरा दिवस चर्चा सुरु  होती. त्यांना सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळी बंदरावर गेलो होतो. थोरल्या बंधुंच्या पासपोर्ट बरोबर आम्ही फोटो काढले, एवढे त्या काळात पासपोर्टचे नाविन्य होते. अशी अाठवणही शरद पवरांनी यावेळी सांगितली. 
 

Web Title: Passport ... Egypt and Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.