हवेलीत उमेदवारी निश्चित करताना पक्षांची दमछाक
By Admin | Updated: February 7, 2017 02:52 IST2017-02-07T02:52:44+5:302017-02-07T02:52:44+5:30
हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेचे १३ गट व पंचायत समितीचे २६ गणांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

हवेलीत उमेदवारी निश्चित करताना पक्षांची दमछाक
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील जिल्हा परिषदेचे १३ गट व पंचायत समितीचे २६ गणांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस त्यामुळे सर्वच पक्षांचे राजकीय नेते, इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते यांच्या अभूतपूर्व गर्दीमुळे शिवाजीनगर पुणे येथील शासकीय गोदाम आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. हवेली निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार : आज १३ जिल्हा परिषद गटांसाठी १०२, तर पंचायत समिती गणांसाठी २१५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने एकूण अर्जाची संख्या १५३ व २९० झाली आहे.
उमेदवार निश्चित करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत होती. आपल्या पक्षाच्या उमेदवाराला धोका पोहोचू नये, म्हणून बंडखोर अथवा अपक्ष उमेदवारांना ते विनंती करताना दिसत होते. प्रसंगी एखाद्या पदाचे आमिष दाखवून त्यांना अर्ज जमा न करण्याची नीतीही काही जणांनी अवलंबली. काहींनी साम, दाम, दंड, भेद याचाही अवलंब केला.
युती व आघाडीचे सूत न जुळल्याने सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांना रिंगणात उतरवल्याने नवख्या इच्छुकांना संधी मिळाली. त्यांमुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. याऊलट पक्षाशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना डावलले गेल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसला. कारण गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी आपल्या पक्षाशी निष्ठा राखून मिळेल ती जबाबदारी पार पाडली; परंतु त्याचा विचार न करता ज्यांनी पक्षांतर केले त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.
ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याकडून पक्षनिष्ठा म्हणून प्रामाणिकपणे काम केले जाईल का? का ते भाऊबंदकी मैत्रीपूर्ण संबंध, नातीगोती यांना प्राधान्य देऊन विरोधकांना मदत करतील, अशा चर्चा गोडाऊन परिसरात रंगल्या होत्या. उमेदवारी आपल्यालाच मिळणार, या हेतूने ज्यांनी गेल्या काही दिवसांपासून निवडून येण्यासाठी मोर्चेंबांधणी केली होती, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, परंतु ऐनवेळी त्यांना डावलले गेल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. आज मांजरी - शेवाळवाडी गटांत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच पुरुषोत्तम धारवाडकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. कदमवाकवस्ती गणांतील राष्ट्रवादीचे अनिल टिळेकर यांनी गेल्या एक महिन्यापासून प्रचारास सुरुवात केली होती. त्यांना डावलल्याने त्यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या रोहिणी राऊत यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्या आता गंगानगर फुरसुंगी गणांतून राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्मसह उमेदवारी दिल्याने त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.