नियोजित विकासात पार्किंग समस्या; अरुंद रस्त्यांचा अडथळा
By Admin | Updated: January 29, 2017 04:20 IST2017-01-29T04:20:48+5:302017-01-29T04:20:48+5:30
सध्याचा वार्ड क्रमांक ७, ८ व ९ मधील भाग एकत्र करून नव्या प्रभागरचनेत औंध-बोपोडी हा प्रभाग क्रमांक ८ तयार झाला आहे. केंद्रसरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेतील

नियोजित विकासात पार्किंग समस्या; अरुंद रस्त्यांचा अडथळा
औंध : सध्याचा वार्ड क्रमांक ७, ८ व ९ मधील भाग एकत्र करून नव्या प्रभागरचनेत औंध-बोपोडी हा प्रभाग क्रमांक ८ तयार झाला आहे. केंद्रसरकारच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेतील पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येणारा भाग म्हणून ओळख असलेल्या औंध भागात गेल्या काही वर्षांत झपाट्याने होणाऱ्या नियोजनबद्ध विकासामुळे सुशिक्षित वर्ग येथे वसलेला आहे. उच्चविद्याविभूषित आणि स्वत:च्या हक्कांविषयी कायम जागरूक असलेल्या रहिवाशांमुळे औंध भागात शहराच्या इतर भागांत जाणवणाऱ्या नागरी समस्या तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाहीत. मात्र पार्किंग, अरुंद रस्ते, वाहतूककोंडी आणि फेरीवाले अशा समस्यांनी औंध परिसर काहीसा ग्रासलेला आहे, तर ड्रेनेज, अंतर्गत रस्ते व सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था ही बोपोडी भागातील सर्वात मोठी समस्या असल्याचे प्रकर्षाने जाणवते. औंध भागातील महादजी शिंदे चौक, छत्रपती चौक, परिहार चौक व भाले चौकातील वाहतुकीची समस्या गंभीर आहे. औंध भागातील अरुंद रस्त्यामुळे भविष्यात या भागातील वाहतूककोंडीची डोकेदुखी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. जकात नाका ते ब्रेमेन चौक असा उड्डाणपूल केल्यास व सक्षम सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केल्यास वाहतुकीची समस्या काही प्रमाणात कमी होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. संपूर्ण औंध व बोपोडी भागात पार्किंगची समस्या दिवसागणिक गंभीर होत चालली आहे. त्यासाठी महापालिकेने पार्किंगच्या प्रश्नाला प्राधान्य द्यावे, असा नागरिकांचा सूर आहे. औंधमधील अनेक सोसायट्यांमध्ये शून्य कचरा मोहीम यशस्वी ठरली आहे. बोपोडीत पालखी मार्गावर उभारलेली स्वागतकमान, आकर्षक विसर्जन घाट, फुटवेअर ब्रिजची निर्मिती, बुद्धविहार व समाजमंदिराची उभारणी, अद्ययावत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, छत्रपती शाहू महाराज पक्षी उद्यानाची निर्मिती, सार्वजनिक बोअरवेलची सुविधा, अद्ययावत व्यायामशाळा उभारणी, बचत गटांना कर्जवाटप, औंध रोडवर योगा हॉलची निर्मिती, डॉ. राजेंद्रप्रसाद मॉडेल स्कूलची निर्मिती, संजय गांधी प्रसूती रुग्णालयाचे प्रगतिपथावरील काम या बोपोडी भागातील विद्यमान लोकप्रतिनिधींच्या जमेच्या बाजू आहेत. संपूर्ण औंध भागात भूमिगत केबल यंत्रणा, सक्षम पाणीपुरवठा, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह, आयटीआय रोडवर वॉकिंग प्लाझा, सांडपाणी निर्मूलन प्रकल्पनिर्मिती, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवननिर्मिती, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार, शेतकरी आठवडेबाजार, राम-लक्ष्मण गार्डनची निर्मिती, स्ट्रीट लाईटची उत्तम व्यवस्था या औंध भागातील विद्यमान लोकप्रतिनिधींच्या जमेच्या बाजू आहेत.
रस्ते व पदपथ फेरीवाल्यांकडून व्यापले जात असल्याने नागरिकांना चालणे आणि वाहने चालविणे शक्य होत नाही. त्यामुळे या भागातील वाहतूककोंडीत आणखी भर पडते. सर्वप्रथम महापालिकेने येथील पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करून द्यावेत.
- नितीन राणे
ओला व सुका कचरा वेगळा करून अनेक सोसायट्यांनी शून्य कचरा मोहीम राबविली आहे. त्यामुळे पालिकेच्या कचरा वाहून नेण्याच्या, तसेच त्याची विल्हेवाट लावण्याच्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र त्या बदल्यात पालिकेकडून या सोसायट्यांना कोणतीही प्रोत्साहनपर सवलत मिळत नाही. ते मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. आर. टी. वझरकर
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांच्या बाहेरील जागा प्रत्येक दुकानदाराने स्वत: फायद्यासाठी अडवलेली दिसते. अनेकदा ती जागा फेरीवाल्यांना भाड्याने दिली जाते. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे शक्य होत नाही. यावर ठोस उपाययोजना आवश्यक आहे.
- ए. पी. बर्वे
पुणे मनपाचे काम औंध भागात निश्चित चांगले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध भागाची क्षेत्रनिहाय विकासासाठी निवड झाल्याने या भागाच्या विकासास आगामी काळात भरपूर वाव आहे. - डॉ. प्रभाकर उलंगवार
औंध परिसर हा उपनगरातील इतर भागांपेक्षा परिसर बऱ्याच अंशी नियोजित आणि नियोजनाच्या आघाडीवर आहे. भविष्यातही औंध स्वच्छ, ग्रीन व सुंदर राहावा ही अपेक्षा.
- विनोद व्होरा
अन्य प्रभागांच्या तुलनेत औंध भागात पाण्याचा मुबलक पुरवठा होतो, ही समाधानाची बाजू आहे; मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न औंधवासीयांना निश्चित भेडसावत आहे.
- सुनीता फडणीस
बोपोडी भागामध्ये हॉकीचे मैदान बांधले आहे. मात्र, मैदानाचे माप चुकल्यामुळे येथे स्पर्धा होऊ शकत नाही. तसेच पुरेशा देखरेखीअभावी अनेक साहित्य चोरीला गेले आहे. याला जबाबदार कोण?
- अजय जगताप
बोपोडी भागातील संजय गांधी प्रसूती रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, सिग्नल यंत्रणा सक्षम व्हावी. नागरिकांसाठी पुरेशी सार्वजनिक शौचालयाची सोय नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.
- संदीप कांबळे
विद्यमान लोकप्रतिनिधींना बोपोडी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यात यश आले आहे. मात्र आजही काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
- युसूफ मुल्ला