३ मार्चला दहावीचा पेपर
By Admin | Updated: July 11, 2014 10:03 IST2014-07-11T09:59:31+5:302014-07-11T10:03:29+5:30
१२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर १०वीची परीक्षा ३ मार्चपासून सुरू होणार आहे.

३ मार्चला दहावीचा पेपर
बारावीचे पेपर २१ फेब्रुवारीपासून
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २0१५मध्ये घेतल्या जाणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा ३ ते २६ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
विद्यार्थांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने आणि शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकर प्रसिद्ध केले जाते. त्यानुसार मंडळाने जुलै महिन्यातच हे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध करण्यात आले आहे.
परीक्षेच्या काळात अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना वेळ मिळावा, यासाठी मंडळातर्फे एका दिवसाआड एक असे पेपर घेतले जाणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक लेखी परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे कळविले जाईल, असे मंडळातर्फे स्पष्ट केले.