पानवेलींना फटका
By Admin | Updated: August 18, 2015 03:42 IST2015-08-18T03:42:31+5:302015-08-18T03:42:31+5:30
निमगाव केतकी परिसरातील पानउत्पादक शेतकरी पानाचे बाजारभाव ढासळल्याने हवालदिल झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये गबाळ पानाच्या डागाची विक्री ३०० रुपये

पानवेलींना फटका
निमगाव केतकी : निमगाव केतकी परिसरातील पानउत्पादक शेतकरी पानाचे बाजारभाव ढासळल्याने हवालदिल झाला आहे. सद्य:स्थितीमध्ये गबाळ पानाच्या डागाची विक्री ३०० रुपये, तर ती पाने बाजारात पोहोचण्यासाठी खर्च ५०० रुपये होत आहे.
गेल्या ७०-८० वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावाबरोबरच परिसरातील पिटकेश्वर, सराफवाडी, गोतोंडी, वरकुटे खुर्द, शेळगाव, बनकरवाडी, पळसदेव, कालठण, व्याहळी, कौठळी, माळवाडी आदी गावांमधील बहुतांश शेतकरी पानवेलींची शेती करतात.
पानवेलींचे मळे जोपासणे सध्याच्या काळात अतिशय जिकिरीचे झाले आहे. तरीही, या भागातील शेतकरी चिकाटीने मळे फुलवतात. या पानवेलीच्या लागवडीपासून ते पानांचा मळा सुरू होईपर्यंत भरपूर खर्च करावा लागतो. पानवेलीची लागवड करीत असताना प्रथम शेणखत एकरी ६ ते ८ टेलर टाकावे लागते. यासाठी किमान ४० ते ४५ हजारांच्या आसपास खर्च होतो. या शेतात मशागत करणे व वाफे बनवणे, यासाठी किमान ४ ते ५ हजार खर्च होतो. या एका वेलाची किंमत ७ ते १० रुपये एवढी असते. साधारणत: आर्धा एकर पानवेलीची लागण करण्यासाठी २० ते २२ हजार रुपये खर्च करावा लागतो. या भागामध्ये पाण्याची टंचाई असल्याने अनेक शेतकरी सुरुवातीपासूनच ठिंबक सिंचन करतात. यासाठी १५ हजारांपर्यंत खर्च करावा लागतो. पानवेलीची लागवड करताना अर्धा एकरासाठी जवळपास १ लाख ते दीड लाख रुपये एवढा खर्च करावा लागतो. परंतु, सुरुवातीला मुबलक पाणी असलेल्या विहिरी व बोरवेल शेजारी इतर बोरवेल व विहिरी झाल्याने पाणी कमी होते.
पाने खुडणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाल्याने मंजुरी खर्चामध्ये वाढ झाली आहे. पानांना मिळणारा बाजारभाव कमी झाला आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. गबाळ जातीच्या पानांची खुडणी करणे व विक्रीसाठी बाजारात नेणे यासाठी ५०० रुपयांच्या आसपास खर्च होतो. मात्र, त्याची विक्री ३०० रुपयांपर्यंत होत आहे. यामुळे पानउत्पादकांना फटका बसत आहे. शेज जातीची पाने ८०० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत विकली जात आहेत. (वार्ताहर)