साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 05:13 IST2025-09-15T05:09:27+5:302025-09-15T05:13:40+5:30

पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या घटक आणि संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

'Panipat' writer Vishwas Patil appointed as literary conference president | साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार

साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार

पुणे : सातारा येथे १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक महाराष्ट्र साहित्य परिषदेत रविवारी पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या घटक आणि संलग्न संस्थांनी पाटील यांचे नाव अग्रक्रमाने सुचविल्यामुळे त्यांची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी बैठकीला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, देवीदास फुलारी, मुंबई मराठी साहित्य   संघाच्या प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, विलास मानेकर, मराठी साहित्य परिषद, तेलंगणाच्या डॉ. विद्या देवधर, छत्तीसगड मराठी साहित्य संघाचे कपूर वासनिक, मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाचे पुरुषोत्तम सप्रे, मराठी वाङ्मय परिषद बडोदाचे संजय बच्छाव, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर यांच्यासह संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महामंडळाच्या घटक, सर्व समाविष्ट तसेच संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले होते. मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्यासाठी दिलेले योगदान विचारात घेऊन विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

चार दिवस रंगणार सारस्वतांचा मेळा

साहित्य संमेलन १ ते ४ जानेवारीदरम्यान असेल. साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये चार दिवस सारस्वतांचा मेळा असणार आहे. ग्रंथदिंडी उद्घाटनाच्या आदल्या दिवशी निघणार असून, त्याच दिवशी दुपारी ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा आणि बालकुमारांसाठीच्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी संमेलनाचे उद्घाटन होईल. यावर्षी पहिल्यांदाच संमेलनाच्या सर्व माजी अध्यक्षांना, सरस्वती सन्मानप्राप्त लेखकांना, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त निवडक लेखकांना तसेच महामंडळाच्या माजी अध्यक्षांना निमंत्रित केले जाईल.

गेली चाळीस वर्षे साहित्याची अखंडपणे सेवा करत आहे. रसिक आणि साहित्य महामंडळाची पसंतीची पावती मिळाली, याचे समाधान आणि खूप आनंद आहे.

विश्वास पाटील

Web Title: 'Panipat' writer Vishwas Patil appointed as literary conference president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.