पांडुरंगाच्या पादुकांना नीरास्नान; पंढरपूरचा दिंडी सोहळा पुणे जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 18:29 IST2017-11-08T18:13:13+5:302017-11-08T18:29:07+5:30

पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. 

pandharpur dindi comes pune distric | पांडुरंगाच्या पादुकांना नीरास्नान; पंढरपूरचा दिंडी सोहळा पुणे जिल्ह्यात

पांडुरंगाच्या पादुकांना नीरास्नान; पंढरपूरचा दिंडी सोहळा पुणे जिल्ह्यात

ठळक मुद्देयावर्षी सोहळ्यासोबत चालत आहेत रथाच्या पुढे १४ व रथामागे ८ दिंड्यासुमारे १५ हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची सोहळाप्रमुख मयूर ननवरेंची माहिती

नीरा : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका मागील चार वर्षांपासून आळंदीला जात आहेत. आज बुधवारी पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. 
पंढरपूरच्या पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला पांडुरंगाच्या पादुका आळंदीला घेऊन जाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष पांडुरंग समाधी सोहळ्यासाठी हजर असतात, अशी वारकर्‍यांची श्रद्धा आहे. वासकरांचे म्हणणे मागील काळात विठ्ठल मंदिर समितीने मान्य करून सोहळा सुरू केल्याचे विठ्ठलराव (दादासाहेब) वासकरमहाराज यांनी सांगितले. 
यावर्षी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे १४ व रथामागे ८ दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाले आहेत. सुमारे पंधरा हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती सोहळाप्रमुख मयूर ननवरे यांनी दिली.  
कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूर येथून निघाला आहे. अष्टमीला आळंदीला दाखल होणार आहे. सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील मुक्काम आटोपून सकाळी लोणंद येथे न्याहरी घेऊन दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीतील प्रसिद्ध दत्तघाटावर सकाळी अकरा वाजता दाखल झाला. या वेळी रथातील पालखी दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीतील पांडुरंगाच्या पादुकांना मोठ्या भक्तिमय वातावरणात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. दत्त मंदिराचे पुरोहित सचिन घोडके यांनी पादुकांचे स्वागत केले. दुपारच्या विसाव्यानंतर सोहळा पुणे जिल्ह्यातील वाल्मीक ऋषींच्या वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला. नीरेतील बाजारपेठेत पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.

Web Title: pandharpur dindi comes pune distric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे