औंध : औंध क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ व बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभाग क्रमांक ९ मधील मतमोजणीसाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती शेंडे व सहायक आयुक्त संदीप कदम यांनी दिली. बाणेर रोडवरील पुरंदर बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.सर्वप्रथम टपाली मतमोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष फेरीस प्रारंभ होईल. दोन्ही प्रभागासाठी १४ टेबल नियोजित असून, ९ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी ४२ मतमोजणी पर्यवेक्षक, ४२ मतमोजणी सहायक व ४२ अतिरिक्त मतमोजणी सहायक यांच्याशिवाय इतर व्यवस्थेसाठी ५० अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी कक्षाबाहेर वेळोवेळी फेरीनिहाय निकाल जाहीर करता यावा यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा बसविण्यात आली आहे. रस्त्यालगत मतमोजणी केंद्र असल्याने वाहतूक व्यवस्थेवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पराभूत उमेदवार किंवा विजयी मिरवणुकीत हाणामारी होऊ नये व कोणत्याही अनुचित घटनांचा वेळीच सामना करण्यात यावा, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली. (प्रतिनिधी)
टपाली मतदानाने होणार सुरुवात
By admin | Updated: February 23, 2017 03:38 IST