अनाथ मुलांबरोबर पाडवा केला गोड
By Admin | Updated: March 29, 2017 00:16 IST2017-03-29T00:16:34+5:302017-03-29T00:16:34+5:30
गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच गुढी उभारली जात असताना, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात असताना येथील

अनाथ मुलांबरोबर पाडवा केला गोड
शिरूर : गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्रच गुढी उभारली जात असताना, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात असताना येथील अॅक्टिव्ह ग्रुपच्या महिलांनी ‘माहेर’ संस्थेतील अनाथ मुलांसमवेत पाडवा साजरा केला. या मुलांच्या जीवनात आनंददायी ‘गुढी’ उभारण्याचा प्रयत्न केला. मराठी नववर्षाची इतकी आनंददायी सुरुवात पाहून मुलेही भारावून गेली. या महिलांचे त्यांनी मनापासून आभार मानले. ‘अॅक्टिव्ह’ ग्रुप हा एक सामाजिक ग्रुप असून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती आपले दायित्व दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. कधी वृद्धाश्रमात जाऊन तेथील वृद्धांच्या चेहऱ्यावर या महिला हसू आणतात, तर कधी विशेष मुलींमध्ये रममाण होऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. या उपक्रमातूनच जीवनाचा आनंद लुटणाऱ्या या ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफणा यांच्या कल्पनेतून ग्रुपच्या सदस्या मंगल संचेती, मनीषा नहार, सपना वरमेचा यांच्या पुढाकारातून आज ग्रुपच्या महिलांनी माहेरमध्ये जाऊन मुलांना स्नेहभोजन दिले. त्या मुलांची आस्थेने चौकशी केली. या मुलांना आनंद देतानाच या महिलांनी आज आॅटोमोबाईल क्षेत्रात काम करणारी वृषाली कर्दिले व ‘जलदूत’ हे पाणी विक्रीची रिक्षा चालवणारी रोहिणी दुर्वे व सुनीता ठुबे यांचा विशेष सत्कार करून त्यांना गौरवले. ‘अॅक्टिव्ह’ ग्रुपच्या अध्यक्षा कामिनी बाफणा, रुपाली बोरा, मोना भंंडारी, रेशमा भंडारी, वर्षा सुराणा, शिल्पा संघवी, भाग्यश्री संघवी आदी या वेळी उपस्थित होत्या. माहेरच्या मीना भागवत व विजय तंवर यांनी स्वागत केले.
मायेचा हात : आनंद देण्याचा प्रयत्न
दिवसभर त्यांच्यासमवेत राहून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. मायेला आसुसलेल्या या मुलांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून काही काळ त्यांना ‘ते’ अनाथ नसल्याचा आभास निर्माण करून दिला. मुलेही या मायेने हरवून गेली. संध्याकाळी या महिला घरी परत परतताना मुलांनी त्यांचे आभार मानले.