गादीवाफ्यांच्या साह्याने भातशेती फायद्याची
By Admin | Updated: November 9, 2015 01:39 IST2015-11-09T01:39:34+5:302015-11-09T01:39:34+5:30
जिल्ह्यात ६२ हजार ३०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. मात्र वर्षभर काबाडकष्ट करून हाती काहीच राहत नाही

गादीवाफ्यांच्या साह्याने भातशेती फायद्याची
डिंभे : जिल्ह्यात ६२ हजार ३०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. मात्र वर्षभर काबाडकष्ट करून हाती काहीच राहत नाही, अशी अवस्था या शेतकऱ्यांची असते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेतीही फायदेशीर व कमी कष्टाची ठरू शकते, हे आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथील एका शेतकऱ्याने यंदा दाखवून दिले आहे. त्यांनी यंदा ५० गुंठे क्षेत्रात गादीवाफ्यांच्या साह्याने लागवड केली असून सर्व खर्च जाता ३५ हजारापर्यंतचे उत्पन्न हाती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
बाळासाहेब कोळप असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून हा प्रयोग राबविल्याने त्यांची भातशेती कौैतुकाचा विषय झाला आहे. या प्रयोगाला सध्या शेतकरी भेटी देत असून नुकतीच शाश्वत संस्थेने आदिवासी शेतकऱ्यांना त्यांची शिवार फेरी घडवून आणली.
कर्जत तालुक्यात भातशेतीसाठी सगुणा राईस तंत्रचा (एस.आर.टी) वापर केला जातो. यातून चांगले उत्पन्न मिळते. यंदा कृषी विभागामार्फत याचा वापर करण्याचे आवाहन भात उत्पादकांना केले होते. आंबेगाव तालुक्यातील सुपेधर, गोहे, पोखरी, राजेवाडी, जांभोरी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात अशा पद्धतीने भातलागवडी केल्या. यातील कोळप यांनी सगुणा राईस तंत्रातील गादीवाफ्याचा प्रयोग केला. याला कृषी विभागाने सहकार्य केले.
त्यांनी भात लागवड चिखलनी करून न करता गादी वाफ्यांचा वापर केला. यासाठी त्यांना आधी भातरोप वेगळे तयार करावे लागले नाही. लागवडीसाठी खाचरातील चिखलनी करावी लागली नाही अथवा लागवडीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही. उंच गादीवाफे तयार करून भातपेरणी केली.
या प्रयोगासाठी त्यांनी सुरूवातीला उन्हाळ्यामध्ये शेतीची नांगरणी करून ५० गुंठ्यांमध्ये साडेचार बाय दीड फूट उंचीचे एकूण १३० बेड तयार करून घेतले. दोन बेडमधील अंतर १ फूट ठेवले. पुढे पावसाळा सुरू होताच २५ सें.मी, या अंतराने बेडवरती ‘मेणक’ निम गरवा या जातीच्या भागाची पेरणी केली. ५० गुंठ्यावरील पेरणीसाठी २० किलो भातबियाणे लागले. १३ ते १५ हजारांपर्यंत खर्च अपेक्षीत असून आता पीक भरघोस असल्याने ३५,००० हजारांचे उत्पन्न हाती पडेल, असे त्यांनी सांगितले.
एकदा तयार केलेले बेड पुढील काही वर्षे वापरात येत असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी बेड तयार करावे लागत नाहीत. याच बेडवर रब्बी हंगामात हरभरा, वाटाण्यासारखी पीके घेतल्यास पोत सुधारून पुढीलवर्षी भातपिकाला याचा फायदा होतो.
कोळप यांनी भातशेतीत राबविलेला हा प्रयोग अतिशय चांगला असल्याने शाश्वत संस्थेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील विविध गावातील शेतकऱ्यांनी या शेतीला भेट देवून या शेतीची माहिती घेतली. त्यांनी राबविलेल्या या प्रयोगाची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी आपल्याही शेतात असे प्रयोग राबवावेत हा या पाठीमागाचा उद्देश असल्याचे या संस्थेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.या वेळी कृषी मंडल अधिकारी डी. एन. गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बी. एस. इसकांडे, एस. व्ही. आवटे, चासकर, कृृ षी सहायक एस. पी. इंदोरे, एस. एन. बागडे इत्यादी उपस्थित होते. (वार्ताहर)