पाबळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट ; टिचिंग लर्निंग कम्युनिटी ग्रुपचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 23:34 IST2021-05-07T23:34:24+5:302021-05-07T23:34:50+5:30
ऑक्सिजन प्लांट उभारल्यामुळे जवळपासच्या ३९ गावांतील रुग्णांना त्याचा फायदा होणार..

पाबळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट ; टिचिंग लर्निंग कम्युनिटी ग्रुपचा पुढाकार
शिक्रापूर : ग्रामीण भागत उभारलेल्या शिरुर तालुक्यातील पाबळ ग्रामीण रुग्णालयाला टिचींग लर्निंग कम्युनिटी ग्रुपच्या वतीने सुमारे चाळीस लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प भेट देण्यात आला असून यामुळे सुमारे ५० रुग्णांना एकाच वेळी ऑक्सिजन देण्याची सुविधा येथे उपलब्ध होणार आहे.
पाबळ येथे सुमारे ३९ गावांना वरदान ठरणारे भव्य ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. सध्या येथे कोविड सेंटर सुरू आहे.नुकतेच भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली टिचींग लर्निंग कम्युनिटी ग्रुप (टी. एल. सी) यांच्या माध्यमातून पाबळ ग्रामीण कोविड रुग्णालास भेट देण्यात आली.
ग्रामीण भागातील या रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारल्यामुळे जवळपासच्या ३९ गावांतील रुग्णांना त्याचा फायदा होणार हे लक्षात घेत याबाबत टी. एल. सी ग्रुप ने पुढाकार घेत जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे ,पाबळचे सरपंच मारुती शेळके ,ग्राम सदस्य व हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी चर्चा केली. याबाबत सकारात्मकता दाखवत या ठिकाणी २० ते २५ दिवसांत प्लँट कार्यान्वयीत करण्यात येणार आहे अशी माहिती टीएलसी ग्रुपचे इरफान आवटे यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सविता बगाटे,सरपंच मारुती शेळके, उपसरपंच राजेंद्र वाघोले, पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव, टीसीएल ग्रुपचे इरफान आवटे, सचिन संगमनेरकर, डी. के. साळुंखे, चंद्रशेखर कुलकर्णी, दिलीप आंबेकर, अनोखी संगमनेरकर उपस्थित होतेे.