वडगाव कांदळी:- जुन्नर तालुक्यातील विशाल सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूलचे अपंग शिक्षक रोहन हांडे यांनी आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी किल्ले हडसर सर करून सर्वांना प्रेरणा दिली आहे.
रोहन हांडे यांनी चिकाटीने व कष्टाने या अपंगत्वाचा सामना केला;पण आपल्या स्वप्नांवर आणि ध्येयांवर पाणी फिरू दिले नाही.त्यांचे सहकारी शिक्षक,क्रीडा शिक्षक विनायक वऱ्हाडी यांनी त्यांना हा दुर्गम किल्ला सर करण्यासाठी प्रेरणा दिली. रोहन हांडे यांना ४८ टक्के अपंगत्व आहे. हांडे यांनी आपल्या अपंगत्ववर मात करून मेहनत घेऊन किल्ला हडसर सर केला.
हा पराक्रम करताना त्यांनी दाखवलेली जिद्द आणि मानसिक ताकद खरोखरच प्रेरणादायी आहे. किल्ले हडसर हा जुन्नर तालुक्यातील एक महत्त्वाचा किल्ला असून त्याचा चढाई मार्ग हा सातवाहन काळापासून अस्तित्वात आहे. तसेच तो मार्ग कठीण आणि आव्हानात्मक आहे. मात्र रोहन हांडे सरांनी या आव्हानाला सामोरे जात उत्कृष्ट उदाहरण सादर केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे तसेच समन्वयिका, शिक्षक विद्यार्थी या सर्वांकडून त्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले. विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुशशेठ सोनवणे व सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांनीही रोहन हांडे यांचे कौतुक व अभिनंदन केले.