महावितरणला थकबाकीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:28+5:302021-08-28T04:14:28+5:30

बारामती : महावितरणची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई सुरू केली आहे. त्यातून शेतीचा ग्राहकही सुटलेला ...

Outstanding shock to MSEDCL | महावितरणला थकबाकीचा शॉक

महावितरणला थकबाकीचा शॉक

बारामती : महावितरणची आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्यामुळे महावितरणने सर्वच थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई सुरू केली आहे. त्यातून शेतीचा ग्राहकही सुटलेला नाही. आता पाणीपुरवठा व दिवाबत्तीची देयके भरण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना महावितरणने नोटिसा दिल्या आहेत. देयके न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे. बारामती परिमंडलात पाणीपुरवठ्याचे ७७२२ व दिवाबत्तीचे ११ हजार ५७७ ग्राहक थकबाकीत आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे १४७ कोटी व ८०९ कोटी इतकी थकबाकी आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने गाव पातळीवरील दिवाबत्तीचे व पाणीपुरवठ्याचे वीजबिल भरण्याची १०० टक्के जबाबदारी आता ग्रामपंचायत पातळीवर सोपवली आहे. त्याकरिता शासनाने १५ व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्याची सूचना ग्रामपंचायतीला केली आहे. वीजबिलांसाठी सरपंच व ग्रामसेवकांना जबाबदार धरणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महावितरणने आता वीजबिलांच्या वसुलीसाठी ग्रामपंयाचतींकडे पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामपंचायतींना तशा नोटिसासुद्धा बजावण्यात आल्या आहेत. वीजबिले भरण्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकींचा आकडा वाढतच आहे. परिणामी महावितरणला कठोर कारवाई करणे भाग पडत आहे.

बारामती मंडलात पाणीपुरवठ्याचे १ हजार १२७ ग्राहक असून त्यांच्याकडे ५४ कोटी ४७ लाख, सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे ३ हजार ८३३ कनेक्शन असून, त्यांच्याकडे ७६ कोटी ७९ लाख तर सातारा जिल्ह्यात २७६२ ग्राहकांकडे १६ कोटी ४२ लाखांची थकबाकी आहे. दिवाबत्तीमध्ये बारामती मंडल ३ हजार ६३५ कनेक्शन व थकबाकी २८१ कोटी १९ लाख, सोलापूर जिल्हा ५ हजार ७७६ ग्राहक ४५७ कोटी ८४ लाख रुपये थकबाकी तर सातारा जिल्ह्यात २ हजार १६६ ग्राहकांकडे ७० कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी आहे.

महावितरणतर्फे ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा व दिवाबत्तीच्या देयकांबाबत पत्रव्यवहार करून अवगत केलेले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनीही महावितरणला सहकार्य करून आपली वीज देयके वेळेत भरावीत व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी केले आहे.

...सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार

घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिकसह शेतीपंपाची थकबाकी वसुली मोहीम देखील बारामती परिमंडलात सर्वत्र सुरू आहे. त्यास ग्राहकांचा प्रतिसादही मिळत आहे. हे पाहता गैरसोय व गर्दी टाळण्यासाठी सोलापूर, सातारा व बारामती मंडलातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवली जाणार आहेत. याशिवाय ग्राहकांना महावितरणच्या मोबाईल अॅप व या संकेतस्थळावरून बिले भरण्याची सुविधा २४ तास सुरू आहे.

Web Title: Outstanding shock to MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.