परदेशी पाहुण्यांमुळे परिसर होतोय रम्य
By Admin | Updated: January 1, 2015 01:07 IST2015-01-01T01:07:47+5:302015-01-01T01:07:47+5:30
थंडीची चाहूल लागताच परदेशी पाहुणे जलाशयाच्या ठिकाणी येतात. सुंदर पक्ष्यांचे नयनरम्य दर्शन आपल्याला घडते.

परदेशी पाहुण्यांमुळे परिसर होतोय रम्य
हडपसर : थंडीची चाहूल लागताच परदेशी पाहुणे जलाशयाच्या ठिकाणी येतात. सुंदर पक्ष्यांचे नयनरम्य दर्शन आपल्याला घडते. त्यांचा किलबिलाट, त्यांचे विविध प्रकारचे आवाज प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. निसर्गाच्या सान्निध्यात या पक्ष्यांबरोबर आनंद घेण्यासाठी पक्षीप्रेमी भल्या सकाळी जलाशयाच्या ठिकाणी भेटी देऊ लागले आहेत. अतिथी देवो भव ही आमची संस्कृती आहे. त्यामुळे आजही जलाशयाच्या ठिकाणी कोसो मैल दूरहून परदेशी पाहुणे येतात. थंडी सुरू झाली, की पक्ष्यांचे थवेच्या थवे जलाशयाकडे धाव घेतात. या पक्ष्याबरोबर आनंद लुटण्याची मजा काही औरच असते. त्यासाठी जलाशयावर जायला पाहिजे.
पुण्याच्या पूर्व भागातील अनेक वर्षांपासून कवडीपाट हे देशीपरदेशी पक्ष्यांसाठी मुक्कामाचे हक्काचे ठिकाण होते. या ठिकाणी थंडीमध्ये पक्षांचा किलबिलाटात त्यांचे अनोखे संमेलनच भरण्याचे ठिकाणच होते. तिबेट, सायबेरिया, नेपाळ, नॉर्थ एशिया, साऊथ-ईस्ट एशिया, आॅस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या प्रदेशांमधून दर वर्षी येथे पक्षी येतात. या पक्ष्यांमध्ये ब्राह्मणी बदक, ग्लॉसी आयबीज, ब्लॅक आयब्रीज, ब्लॅक नेक आयबीज, पेेंटेड स्टॉर्क, नकटे बदक, स्टॉर्क, धोबी आणि देशी पक्ष्यांचाही समावेश होता. मात्र, कवडीपाटची सध्याची स्थिती विषण्ण करणारी असल्यामुळे पक्ष्यांबरोबर पक्षी-निरीक्षकांनीही या जलाशयाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे.
शहर परिसरातून नदीतील पाण्यावाटे प्लॅस्टिक, थर्माकोल, कपडे, कचरा वाहत येत असल्यामुळे बंधाऱ्यापाशी अडकला आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. प्लॅस्टिकच्या वेष्टनात असलेले अन्न पक्षी खातात. मात्र, ते खात असताना पक्ष्यांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक गेल्यामुळे अनेक पक्ष्यांना जीवही गमवावा लागत आहे, अशी माहिती पक्षीप्रेमींनी दिली. येथील परिस्थिती सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच, पक्ष्यांचे अस्तित्व टिकविण्याबरोबर पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी शहरातून वाहत येणाऱ्या कचरा थांबविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशीच भावना पक्षीप्रेमींबरोबर निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी व्यक्त केली. (वार्ताहर)
४अलीकडे प्लॅस्टिकचा कचरा, निर्माल्य, फाटके कपडे आणि कचऱ्यामुळे कवडीपाट येथील जलाशयात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे हा जलाशय आता पक्षांसाठी मृत्यूचे माहेरघर बनले आहे की काय, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले. खडकवासला, पानशेत, वरसगाव, तसेच शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर पुण्याच्या पूर्व भागात असलेले हवेली तालुक्यातील कवडीपाट हे गाव सोलापूर रस्त्यालगत आहे.