...अन्यथा कोरोनाची औषधे दुकानात ठेवताना विचार करू; विक्रेत्यांचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 13:26 IST2022-01-21T13:26:12+5:302022-01-21T13:26:25+5:30
कोरोनाचे होम टेस्टिंग किटच्या ऑनलाइन विक्रीवर शासनाचा कोणताही अंकुश नाही. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन लादू नये

...अन्यथा कोरोनाची औषधे दुकानात ठेवताना विचार करू; विक्रेत्यांचा सरकारला इशारा
पुणे : कोरोनाचे होम टेस्टिंग किटच्या ऑनलाइन विक्रीवर शासनाचा कोणताही अंकुश नाही. अशा परिस्थितीत अन्न आणि औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांवर विक्रीचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन लादू नये. अन्यथा औषध विक्रेत्यांना कोरोनाशी संबंधित औषधे दुकानात ठेवताना विचार करावा लागेल आणि आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेने दिला आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना होम टेस्टिंग किटचे रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या आदेशाबाबत अनेक औषध विक्रेत्यांनी महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेकडे नाराजी व्यक्त केली आहे. औषध विक्रेत्यांपेक्षा होम टेस्टिंग किटची मोठ्या प्रमाणात ऑनलाइन विक्री केली जात आहे आणि त्यावर प्रशासनाचा कोणताही अंकुश नाही. औषध विक्रेत्याने ग्राहकास आधार नंबर किंवा मोबाइल नंबर मागितल्यास ग्राहकाकडून त्यास विरोध केला जात आहे अथवा वाद-विवादाची परिस्थिती निर्माण होत आहे, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.
रुग्णाने सेल्फ टेस्टिंग किटचा वापर करून पॉझिटिव्ह आल्यानंतरही निगेटिव्ह असल्याचे सांगितल्यास त्यावर प्रशासनाचा कसा अंकुश राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये किटचा वापर रोखण्याचा प्रयत्न केल्यास कदाचित परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. शासन अथवा प्रशासन जोपर्यंत ऑनलाइन विक्री थांबवणार नाही, तोपर्यंत औषध विक्रेत्यांवरही तपशील ठेवण्याचे बंधन घालू नये, असे नमूद केले आहे.
विक्रेत्यांना नेहमीच लक्ष्य केले जाते...
प्रशासनाने अधिकाराचा उपयोग करत औषध विक्रेत्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास करून कोरोना उपचाराशी संबंधित औषधांचा साठा दुकानात ठेवण्याबाबत औषध विक्रेत्यांना विचार करावा लागेल. यामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीत शासन आणि प्रशासन जबाबदार राहील. शासन व प्रशासनाने औषध विक्रेत्यांना नेहमीच सॉफ्ट टारगेट समजून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास तो सहन न करता संघटनेकडून आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.