पुणे : गेल्या ७५ वर्षांपासून भारत पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पाकिस्तानने कायम दहशतवादाला खतपाणी घातले आहे. पाकिस्तान आजही भारताला अणवस्त्रांची धमकी देत आहे. त्यांच्याकडून भारतीय सीमेवर हल्ले, छोट्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे पाकिस्तानला केवळ काश्मीर ताब्यात घ्यायचे नसून, भारताला नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कर्नल अनिल आठले यांनी व्यक्त केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित "वसंत व्याख्यानमाले'च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रातील सदा डुंबरे स्मृती व्याख्यानात पाकिस्तानबरोबर सर्वांगीण युद्धाला पर्याय काय? या विषयावर आठले बोलत होते. आठले म्हणाले, भारत हा कायम अहिंसा पाळणारा देश आहे.
आपण बुद्धांच्या भूमीत राहतो. त्यांची तत्त्वे व निष्ठा देशाप्रती प्रामाणिकपणा आपल्यात आहे. मात्र, पाकिस्तान हा दुटप्पी भूमिका घेणारा आहे. केवळ हिंदू-मुस्लीम करून आंतकी हल्ले करण्यातच तो धन्य समजतो. युद्धभूमीवर पाकिस्तानला अनेक वेळा भारताने धडा शिकविला आहे. कारगिल युद्धात पाकिस्तानला चांगली चपराक बसली आहे. मात्र, पाकिस्तानात आजपर्यंत कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्याला प्रत्युत्तर देऊनच शांत करावे लागेल, असेही आठले यांनी नमूद केले.
पोकळ धमकी देणे बंद करायला हवेपाकिस्तान हा अणवस्त्र व क्षेपणास्त्रांच्या जोरावर भारतासह इतर राष्ट्रांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ अणवस्त्र व क्षेपणास्त्र जवळ असून चालत नाही, तर त्यांची वहनक्षमता त्या देशात असणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत ही वहनक्षमता पाकिस्तानकडे उपलब्ध नाही. पाकिस्तानने अशी पोकळ धमकी देणे बंद करावे. यातच त्यांच्या राष्ट्राचे हित आहे, असे, आठले यावेळी म्हणाले.