only thousands rupees can be withdrawn from ShivajiRao Bhosale bank : The RBI's restrictions | शिवाजीराव भोसले बँकेच्या खातेदारांना हजारच काढता येणार : आरबीआयचे निर्बंध 
शिवाजीराव भोसले बँकेच्या खातेदारांना हजारच काढता येणार : आरबीआयचे निर्बंध 

ठळक मुद्देगेल्या महिन्यात (२९ एप्रिल) आरबीआयने बँकेने मोठ्या रक्कमेच्या ठेवी स्वीकारण्यास केली मनाईआर्थिक अनियमिततेमुळे सहकार विभागाकडून बँकेवर कलम ८८ अंतर्गत देखील कारवाई सुरु

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध घातल्याने, बँकेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे बँकेतील सर्व खातेदारांना केवळ एक हजार रुपयांची रक्कमच खात्यातून काढता येणार आहे. त्यामुळे बँकेत बचत आणि चालू खाते असणाऱ्या हजारो खातेदारांना त्याचा फाटका बसणार आहे. 
गेल्या महिन्यात (२९ एप्रिल) आरबीआयने बँकेने मोठ्या रक्कमेच्या ठेवी स्वीकारण्यास मनाई केली होती. तसेच मुदतीपुर्वी ठेवी काढण्यास, मुदत ठेवींवर कर्ज देण्यासही निर्बंध घातले होते. त्या पाठोपाठ आरबीआयने बँकेतून पैसे काढण्यावर देखील निर्बंध घातले आहेत. आरबीआयने त्या बाबतचा सविस्तर आदेश दिला आहे. आर्थिक अनियमिततेमुळे सहकार विभागाकडून बँकेवर कलम ८८ अंतर्गत देखील कारवाई सुरु आहे. 
बँकेतील सर्व खातेदारांना त्यांच्या खात्यात कितीही रक्कम असली तरी जास्तीत जास्त एक हजार रुपयांची रक्कम खात्यातून काढता येईल, असे आरबीआयने आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे. नवीन कर्ज स्वीकारण्यास अथवा कर्ज खात्याची पुर्नरचना करण्यावर देखील बंधन घातले आहे. नवीन खाती स्वीकारण्यावर देखील बंधन आले आहे. म्हणजेच या पुढे बँकेला बँकींग व्यवसाय करता येणार नाही. मात्र, बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँकेची स्थिती सुधारल्यानंतर निर्बंध शिथील करण्यात येतील, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, आरबीआयने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास बँकेचा परवाना रद्द करण्याचा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. 
-----------------
बँकेवर तज्ज्ञ संचालक मंडळ नेमावे : मिहिर थत्ते
बँकेच्या शहरात १२ शाखा असून, सुमारे ३० ते ३५ खातेदार आहेत. या खातेदारांचे हीत लक्षात घेऊन सहकार आयुक्तांनी बँकेवर ३ जणांच्या संचालक मंडळाची नियुक्ती करावी. त्यात सहकार विभागाचा अधिकारी, सीए आणि वसुलीची जाण असणारा अधिकारी असावा अशी मागणी सहकार आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. येत्या गुरुवारी सहकार आयुक्तांची त्याबाबत भेट घेणार असल्याचे पुणेकर नागरीक कृती समितीचे मिहिर थत्ते यांनी सांगितले.  


Web Title: only thousands rupees can be withdrawn from ShivajiRao Bhosale bank : The RBI's restrictions
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.