केवळ शेठजी-भटजीचेच सरकार नाही
By Admin | Updated: August 14, 2015 03:01 IST2015-08-14T03:01:44+5:302015-08-14T03:01:44+5:30
पूर्वी भाजपची शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळख होती. त्यामुळे आम्ही सत्तेबाहेर राहिलो. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेतल्यानंतर सत्तेत आलो आहे

केवळ शेठजी-भटजीचेच सरकार नाही
पुणे : पूर्वी भाजपची शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून ओळख होती. त्यामुळे आम्ही सत्तेबाहेर राहिलो. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेतल्यानंतर सत्तेत आलो आहे. त्यामुळे आम्हाला केवळ शेठजी-भटजीचा विचार करून चालणार नाही. शेतकरी व झोपडपट्टीतील शेवटच्या नागरिकांचेही विचार आमचे सरकार करीत आहे, अशी टिप्पणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
दि पूना मर्चंट्स चेंबरच्या बाबा पोखर्णा स्मृतिप्रीत्यर्थ आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कारांचे वितरण पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट अध्यक्षस्थानी होते. बाबा पोकर्णा राज्यस्तरीय पुरस्कार केवलचंद्र कटारिया, जिल्हास्तरीय पुरस्कार नगराज जैन व भगवानदास सुगंधी यांना प्रदान करण्यात आला. तर वीरेन गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार विनायक करमरकर यांना देण्यात आला. त्या वेळी महापौर दत्तात्रेय धनकवडे, आमदार माधुरी मिसाळ, चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, रायकुमार नहार, राजेंद्र तापडिया, वालचंद संचेती, पोपटलाल ओस्तवाल, राजेंद्र बाठिया आदी उपस्थित होते.
राज्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एलबीटी रद्द केल्यामुळे ११ लाख व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला असून, ५० कोटीपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या ११०० व्यापाऱ्यांना केवळ कर भरावा लागणार आहे. व्यापाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न आहे, असे पाटील यांनी सांगितले. केवळ पैशातून पैसा निर्माण करण्यापेक्षा व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली
आहे.
बाबा पोखर्णा यांचा आदर्श ठेवून सर्व व्यापाऱ्यांनी शेतकरी, हमाल व कामगारांचे हित जपले पाहिजे, असे आवाहन गिरीश बापट यांनी केले.
व्यापाऱ्यांनी सचोटीने काम केल्यास समाजाचा उत्कर्ष होतो. व्यापारी वर्गाने केवळ अन्याय सहन करीत राहू नये. तसेच, सत्तेत आल्यानंतर शेठजी-भटजीच्या पक्षाने व्यापाऱ्यांना विसरू नये, असे मनोगत केवलचंद कटारिया यांनी सत्काराला उत्तर देताना केले. प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)