मनाच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या

By Admin | Updated: August 13, 2014 04:31 IST2014-08-13T04:31:58+5:302014-08-13T04:31:58+5:30

‘‘शरीराच्या आजाराकडे आपण काळजीपूर्वक पाहतो, तितके मनाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यावर ही वेळीच उपचार करून घ्यावेत आणि मनाचे आरोग्यही जपावे

Only pay attention to the health of mind | मनाच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या

मनाच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या

पिंपरी : ‘‘शरीराच्या आजाराकडे आपण काळजीपूर्वक पाहतो, तितके मनाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यावर ही वेळीच उपचार करून घ्यावेत आणि मनाचे आरोग्यही जपावे,’’ असा मोलाचा सल्ला मनोविकार तज्ज्ञांनी दिला.
लोकमततर्फे मनोविकार तज्ज्ञांच्या परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मनोविकारतज्ज्ञ डॉ. धनंजय अष्टुरकर, डॉ. भारत सरोदे, डॉ. दीपक मेटकर, डॉ. सुरेशकुमार मेहता, डॉ. संदीप जगताप उपस्थित होेते.
मनोविकाराबाबत बोलताना डॉक्टर म्हणाले, ‘‘ मानसिक आजार झाल्याचे जनसामान्यांच्या लवकर लक्षात येत नाही. विविध आजारांवर वेगवेगळे उपचार केले जातात. त्यानंतर मनोविकार तज्ज्ञांकडे उपचारासाठी येतात. त्यात चार ते पाच वर्षाचा कालावधी जातो. तसेच या आजाराबद्दल बरेच गैरसमज आहेत. याकडे बघण्याचा (दृष्टीकोन) वेगळा आहे. मनोविकार तज्ज्ञांकडे गेले की कलंकित झाल्याची भावना रुग्णाच्या मनात निर्माण होते. ही भावना कमी झाली पाहिजे. हे आजार बहुतांशी ताणामुळे होतात. तसेच अनुवांशिकतेमुळेही हा आजार होतो. सर्वच आजारांचे कारण बहुतांशी मानसिकच असते.
या आजाराच्या उपचार पद्धतीबाबतही गैरसमज आहेत. तसेच याबाबत काही चित्रपटांमधूनही चुकीची माहिती देण्यात येते. मनोविकार तज्ज्ञांची प्रतिमा मलिन केली जाते. देवराई,चौकट राजा या चित्रपटांमधून मात्र वास्तववादी चित्र दाखवण्यात आले आहे. अन्य चित्रपटांमध्ये मनोविकार तज्ज्ञांबद्दल दाखविण्यात येणारे प्रसंग समाजात गैरसमज पसरविण्यास कारणीभूत ठरतात.
या आजारावर उपचार केल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. इतर आजारासारखीच ही उपचारपद्धती आहे. जसे मधुमेह आणि रक्तदाबाची औषधे घेतो, त्याप्रमाणे ही औषधे घ्यावीत. आजाराच्या स्वरूपानुसार औषधानुसार कालावधी ठरला जातो. यासाठी अनेक वर्ष उपचार करावे लागतात, हा गैरसमज आहे. पण औषधे ही तज्ज्ञांच्या मागदर्शनानुसार घ्यावीत. अनेक वर्ष तीच औषधे खाऊ नयेत. व्यसन हा मानसिक आजार व्यसन हा मोठा मानसिक आजार आहे. यावरही उपचार केल्यास त्यापासून मुक्ती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. पण व्यसनमुक्तीच्या जाहिराती देऊन लोकांची लुबाडणूक केली जाते. हे प्रकाराला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
संमोहनशास्त्र उपचारपद्धती
काही जण संमोहन शास्त्राद्वारे उपचार करून आजार बरा करण्याची जाहिरात देतात, परंतु ही एक उपचार पद्धती आहे. सर्वच आजारावर याद्वारे उपचार करणे धोक्याचे असते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या उपचारपद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. विनाकारण या उपचार पद्धतीचा वापर केल्यास दुष्यपरिणाम होण्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
विमा संरक्षण हवे
या आजारासाठी शासनाकडून अथवा विमा कंपनीकडून बिलांची परिपूर्ती मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते, यासाठी विमा कंपनीने आणि शासनाने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही मनोविकार तज्ज्ञांनी केली.
वैद्यकीय शिक्षणात विषयाकडे दुर्लक्ष
या आजाराकडे वैद्यकीय शिक्षणात दुर्लक्ष केले आहे. एमबीबीएससाठी तर हा विषय पाच गुणांसाठी आहे. तोही ऐच्छिक आहे. या विषयाचा समावेश शालेय शिक्षणापासून करणे गरजेचे आहे.
अत्याधुनिक उपचार केंद्र पुणे शहर जसे आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच मनोविकारावर उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा असलेली उपचार केंद्र पुण्यात आहेत. तीन पुनर्वसन केंद्र आहेत. दोन व्यसनमुक्ती केंद्रसुद्धा आहेत. मनोविकार तज्ज्ञांच्या इंडियन सायकियॅट्रिक सोसायटी आणि पुना सायकियाट्रिक सोसायटी अशा दोन संस्था कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Only pay attention to the health of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.