करिअर निवडीसाठीच आॅनलाईन निकाल
By Admin | Updated: June 2, 2014 00:30 IST2014-06-02T00:30:55+5:302014-06-02T00:30:55+5:30
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खर्या अर्थाने विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या वाटा निवडण्याची संधी उपलब्ध होते.

करिअर निवडीसाठीच आॅनलाईन निकाल
पुणे: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर खर्या अर्थाने विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या वाटा निवडण्याची संधी उपलब्ध होते. परंतु, आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिकेची मूळ प्रत मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेता येत नाही. आॅनलाईन निकाल प्रसिद्ध झाल्यावर सुमारे आठ दिवसांनी गुणपत्रिकेच्या मूळ प्रती दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी भरपूर वेळ असणार आहे. निकालाची मूळ प्रत मिळेपर्यंतच्या आठ दिवसांचा पुरेपूर उपयोग पालक व विद्यार्थ्यांनी करिअर निवडीसाठी करून घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या समुपदेशकांकडून केले जात आहे. आपल्या पाल्याला बारावीमध्ये अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले, तर पालकांना फारशी काळजी नसते. परंतु, अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास पालकांना आपल्या करिअरबाबत काळजी वाटते. चांगले गुण मिळाले, तरीही कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, हा प्रश्न त्यांना सतावत असतो. तर, कमी गुण मिळाल्यावर आता कोणत्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन द्यावा, याची चिंता पालकांना सतावत असते. त्यात आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका हातात मिळेपर्यंत काय करावे, हेसुद्धा अनेकांना सुचत नाही. त्यामुळेच राज्य शिक्षण मंडळाने प्रत्येक जिल्ह्यासाठी समुपदेशकाची व हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. करिअर व मिळालेल्या गुणाबाबत शंकांबाबत विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. शिक्षण मंडळाचे समुपदेशक टी. एम. बांगर म्हणाले, केवळ अभियांत्रिकी आणि मेडिकल अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला, तरच विद्यार्थ्यांना करिअर करता येते, असे होत नाही. तर, या व्यतिरिक्त इतरही क्षेत्रांत करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. करिअरच्या विविध संधींबाबत माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांना पुरेसा अवधी उपलब्ध आहे. कला, वाणिज्य विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनाही करिअरच्या वेगवेगळ्या संधी अलीकडच्या काळात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पारंपरिक शिक्षण न घेता इतर पर्यायांचा विचार करायचा आहे, त्यांनी नव्याने निर्माण झालेल्या संधी निवडाव्यात.