अर्ज दाखल करताना ‘आॅनलाईन’ डोकेदुखी

By Admin | Updated: February 5, 2017 03:23 IST2017-02-05T03:23:41+5:302017-02-05T03:23:41+5:30

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट असल्याने इच्छुक उमेदवारांसाठी

'Online' headache while filing an application | अर्ज दाखल करताना ‘आॅनलाईन’ डोकेदुखी

अर्ज दाखल करताना ‘आॅनलाईन’ डोकेदुखी

पुणे/यवत : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट असल्याने इच्छुक उमेदवारांसाठी ती ‘आॅनलाईन डोकेदुखी’ ठरत आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. आॅनलाईन भरण्याचा निवडणूक अर्ज, प्रतिज्ञापत्रे व सोबत द्यावी लगणारी कागदपत्रे आदी प्रक्रिया करावी लागत असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या क्लिष्ट प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत
समिती निवडणुकीसाठी शंभर टक्केउमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, सध्या आयोगाचे संकेतस्थळ हँग होणे, नेट कनेक्शन न मिळणे, संपूर्ण अर्ज भरल्यानंतरही प्रिंट आऊटमध्ये काही रकाने रिक्त राहणे, कागदपत्रे अ‍ॅटॅच न होणे आदी अनेक अडचणी व अडथळ्यांना उमेदवारांना सामोरे जावे लागत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने आधी उमेदवारी अर्ज दाखल करू आणि मग पक्षाच्या तिकिटाचे बघू, अशी भूमिका बहुतांश इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाने आॅनलाईन प्रक्रिया दिलेली आहे.
उमेदवारास तब्बल ७२ पानांचा अर्ज आॅनलाईन भरून मग दाखल करायचा असल्याने इच्छुकांना इंटरनेटची माहिती असणारे लोक शोधून अर्ज भरण्यासाठी तासन्तास संगणकासमोर बसून राहावे लागत आहे.
निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अनेक दाखले व कागदपत्रेदेखील आवश्यक असून, ते जमा करताना अनेकांची दमछाक होत आहे. पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत इच्छुक उमेदवार दाखले जमा करताना दिसत आहेत.
दौंड येथील पंचायत समिती कार्यालयात जाऊन याबाबतची माहिती घेत असताना अचानक एकाच वेळी तालुक्यातील प्रमुख पक्षांची मंडळी तेथे आढळून आली. त्यांनी निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया क्लिष्ट ठेवल्याने नाराजी व्यक्त केली. आज विविध पक्षांचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आॅनलाईन अर्ज भरण्यासाठीच धडपडताना दिसत होते.

आमच्या वेळी केवळ तीन पानी असलेला उमेदवारी अर्ज होता. यामुळे आतासारखी नसती धावपळ करावी लागली नाही. आताच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे सामाजिक कार्य करणारे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते बुचकळ्यात पडत आहेत.
- दौलत ठोंबरे, माजी सदस्य,
पंचायत समिती दौंड

निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. आॅनलाईन दाखल करायचा अर्ज ७२ पानांचा आहे. यात नेमकी माहिती आणि आवश्यक कागदपत्रे असती तर इतका वेळ यासाठी गेला नसता. यामुळे उमेदवारांना नाहक धावपळ करावी लागते. निवडणूक आयोगाने अत्यंत अवघड प्रक्रिया राबविण्यापेक्षा ग्रामीण भागातील उमेदवारांचा विचार करून सोप्या पद्धतीने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविणे आवश्यक होते.
- वैशाली नागवडे, अध्यक्षा, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस

उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक शपथपत्रे उमेदवारास देणे गरजेचे आहे. यात निवडणूक आयोगाने सर्व मिळून एकच शपथपत्र घेतले असते तर आता करावी लागणारी नसती धावपळ कमी झाली असती. आॅनलाईनमुळे वेळ वाचण्यापेक्षा उलट आता यातच तीन ते चार दिवस जात आहेत.
- हरिभाऊ ठोंबरे, माजी संचालक, भीमा-पाटस कारखाना

Web Title: 'Online' headache while filing an application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.