कांदा, वाटाणा, गवार, मेथीने खाल्ला भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2015 02:07 IST2015-09-04T02:07:21+5:302015-09-04T02:07:21+5:30
पाण्याच्या कमतरतेमुळे बारामती तालुक्याच्या बागायती भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडींना फाटा देऊन तरकारी पिकांच्या लागवडी केल्या. त्यामुळे बाजारातील भाजीपाला

कांदा, वाटाणा, गवार, मेथीने खाल्ला भाव
बारामती : पाण्याच्या कमतरतेमुळे बारामती तालुक्याच्या बागायती भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडींना फाटा देऊन तरकारी पिकांच्या लागवडी केल्या. त्यामुळे बाजारातील भाजीपाला अणि फळभाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर राहिले आहेत. मात्र कांदा, गवार, मेथी, वाटाणा यांनी चांगलाच भाव खाल्ला आहे.
पावसाळा सुरू झाला की , बारामतीच्या बागायती भागात मोठ्या प्रमाणात अडसाली ऊस लागवडी केल्या जातात. पावसाने मारलेली दडी व पाण्याच्या कमतरेमुळे भविष्यात ऊस जगविणे मुश्कील होणार आहे. तसेच धरणांमध्येही अल्प पाणीसाठा आहे. तालुक्यातील सर्वच साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवडींमध्ये २५ ते ३० टक्के घट झाली आहे. घट झालेल्या क्षेत्रावर येथाल शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तरकारी पिकांच्या लागवडी केल्या आहेत. परिणामी भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात स्थिर राहण्यास मदत झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पुढील दोन-तीन महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले आहे. मात्र कांदा ६० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो तर मेथीचा एक पेंडी १५ रुपयाला मिळत आहे. आठवडी बाजारात अजून दर वाढले नसल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परंतु याही महिन्यात पाऊस झाला नाही तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजीपाल्याचे दर वाढतील असे येथील भाजी विक्रेत्या पुष्पा गदादे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)