कांदा खातोय भाव; प्रतिकिलो ५० रुपयाने विक्री..!
By Admin | Updated: August 10, 2015 02:43 IST2015-08-10T02:43:54+5:302015-08-10T02:43:54+5:30
गेल्या तीन महिन्यांत घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २०० टक्क्यांनी वाढले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जुन्नर कृषी

कांदा खातोय भाव; प्रतिकिलो ५० रुपयाने विक्री..!
पुणे/जुन्नर : गेल्या तीन महिन्यांत घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर थोडेथोडके नव्हे, तर तब्बल २०० टक्क्यांनी वाढले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जुन्नर कृषी बाजार समितीत २ मे रोजी क्विंटलमागे १ हजार १०१ रुपये असलेला कांद्याचा सरासरी दर आज ४ हजारांवर पोहोचला. पुणे मार्केड यार्डात दहा किलोला तो ४२0 रुपयांवर तर चाकणला ३८0 पर्यंत गेला. कांद्याने चांगलाच भाव खाल्ला आहे.
या भाववाढीमुळे शेतकरी काहीसे सुखावले आहेत. हा दर १ नंबर कांद्याला मिळत आहे. मात्र, किरकोळ बाजारात खराब कांदाही ५० रुपये किलोने विकला जात असल्याने ग्राहकांची मात्र लूट होत आहे.
साधारणपणे मार्च महिन्यात उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच आॅगस्टनंतर नवे पीक येते. उन्हाळी कांदा टिकावू असल्याने शेतकरी त्याची साठवणूक करतात व तो ठराविक अंतराने बाजारात आणतात. मात्र, यंदा देशात गारपीट व अवकाळी पावसाने उन्हाळी कांद्याला फटका बसला. परिणामी उत्पादन घटले. त्यातही साठवणूक केलेल्या कांद्याची प्रत खराब झाली. महाराष्ट्रानंतर कांद्याचे मोठे उत्पादन होणाऱ्या आंध्र प्रदेश व कर्नाटकात यंदा अपेक्षित पीक आले नाही. त्यामुळे एकीकडे जूननंतर बाजारात मागणी वाढत असताना पुरवठ्यात मात्र वाढ झाली नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत २०१४ च्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांत आवक घटली नसताना भाव मात्र दुप्पट झाले आहेत. आॅगस्ट २०१४ मध्ये क्विंटलमागे असलेला सरासरी १ हजार ५०६ रुपये दर आता सरासरी ३ हजार ४०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर गेल्या काही दिवसांत ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. एकूणच यंदा नवीन लागवडही खोळंबल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
गवार, भेंडीच्या भावात वाढ/वृत्त ४