आरोग्य सेवकांसाठीच्या विमा संरक्षण योजनेला एक वर्षाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:09 IST2021-04-26T04:09:13+5:302021-04-26T04:09:13+5:30

कोरोना संकट सुरू झाल्यापासून ही विमा संरक्षण योजना राबविली जात होती. परंतु २४ मार्च २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ...

One year extension of insurance protection scheme for health workers | आरोग्य सेवकांसाठीच्या विमा संरक्षण योजनेला एक वर्षाची मुदतवाढ

आरोग्य सेवकांसाठीच्या विमा संरक्षण योजनेला एक वर्षाची मुदतवाढ

कोरोना संकट सुरू झाल्यापासून ही विमा संरक्षण योजना राबविली जात होती. परंतु २४ मार्च २०२१ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिपत्रक काढून ही योजना रद्द केली होती. ही विमा योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी पत्राद्वारे डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली होती. त्यावर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेत या विमा संरक्षण योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिल्या बद्दल केंद्र सरकार व आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आभार मानले .

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आरोग्यसेवा देताना ज्या आरोग्य सेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत ५० लाख रुपयांची विमा संरक्षण योजना राबविली जात होती. मात्र मुदत संपल्याचे कारण देत ही विमा संरक्षण योजनाच बंद करत असल्याचे राज्य सरकारांना कळविले होते. मात्र, अद्यापही कोरोनाची लाट ओसरली नसून पूर्वीपेक्षा तिची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे सर्व आरोग्य सेवकांसाठी विमा संरक्षण योजना सुरू ठेवावी, अशी आग्रही मागणी १९ एप्रिल २०२१ रोजी केली होती. या मागणीचा गांभिर्याने विचार करत केंद्र सरकारने विमा संरक्षण योजनेला एक वर्षाची मुदतवाढ दिल्याची अधिकृत घोषणा केली.

Web Title: One year extension of insurance protection scheme for health workers