साडेसहाशे महिला ४४ बसच्या मालकिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:39+5:302021-03-09T04:12:39+5:30
----------------- सैनिकपत्नींची यशोगाथा : ‘पीएमपीएल’ची मोलाची साथ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माजी सैनिकांच्या पत्नींनी बचत गट स्थापन करून ...

साडेसहाशे महिला ४४ बसच्या मालकिणी
-----------------
सैनिकपत्नींची यशोगाथा : ‘पीएमपीएल’ची मोलाची साथ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माजी सैनिकांच्या पत्नींनी बचत गट स्थापन करून पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायात पाऊल टाकले. कोरोना आपत्तीतही त्या ठाम राहिल्या. कुटुंबात मागेमागे राहणाऱ्या महिलांसाठी नवा आदर्श तयार केला.
बचत गटाच्या माध्यमातून त्यांंनी ही कामगिरी केली. कोरोना अनलॉकनंतर सर्व बस व्यवस्थित सुरू झाल्यावर त्या आता अधिक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत.
किमान ११ व जास्तीत जास्त १५ महिलांचे ४४ बचत गट आहेत. त्यातील बहुतांश महिला माजी सैनिकांच्या पत्नी आहेत, काही विधवा आहेत. सातारा, पुणे व अहमदनगर व अन्य १० जिल्ह्यांमधील त्या रहिवासी आहेत. सातव्या बेळगाव मराठा लाइट इन्फंट्रीमधील निवृत्त सैनिक सुरेश गोडसे यांनी या महिलांचे बचत गट तयार केले. त्यांची कंपनी स्थापन केली. प्रत्येकीने ८० हजार रुपये जमा केले. माजी सैनिक कल्याण मंडळाने बचत गटाला १० लाख रुपयांचे अनुदान दिले. बँक ऑफ महाराष्ट्रने साडेसहा लाख रुपये कर्ज दिले. असे प्रत्येक बससाठी करून या कंपनीने प्रति ४१ लाख रुपये किमतीच्या ४४ प्रवासी बस खरेदी केल्या.
पीएमपीएलने बयाणा रक्कम, निविदा ही प्रक्रिया मागे घेत प्रत्येक किलोमीटरला ५७ रूपये १७ पैसे या दराने सर्व बस भाडे तत्वावर स्वीकारल्या. बसचा फक्त वाहक व वेळापत्रक पीएमपीएलचे बाकी चालक, देखभाल दुरूस्तीची सर्व जबाबदारी कंपनीची. रोज किमान २०० किलोमीटरचे भाडे द्यायची हमीही दिली.
हे सगळे नियमित झाले व कोरोना टाळेबंदी लागली. पीएमपीएलची वाहतूक बंद झाली. नव्या गाड्या जागेवर पडून होत्या. बँकेने, पीएमपीएलने परिस्थिती लक्षात घेत आर्थिक व्यवहार पुढे ढकलले. टाळेबंदी उठल्यावर पुन्हा सगळे नीट सुरू झाले आहे. पीएमपीएलने दरमहा बिल अदा करावे, अशी विनंती कंपनीने महापौर व पीएमपी अध्यक्षांना केली आहे. आता ही कंपनी सातारा परिसरात मॉल सुरू करण्याच्या तयारीत आहे.
चौकट
“बचत गटातील अनेक महिला आता कंपनीचे कामकाज पाहण्यासाठी तयार होत आहेत. माजी सैनिक कल्याण मंडळाचे राज्याचे उपसंचालक निवृत्त कर्नल राजेंद्र जाधव, तत्कालीन महापौर मुक्ता टिळक व पीएमपी अध्यक्ष नयना गुंडे यांचे मोठे सहकार्य मिळाले,” असे कंपनीचे प्रवर्तक सुरेश गोडसे यांनी सांगितले.