Omicron Patient in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही ओमायक्रॉनची 'एंट्री'; जुन्नरमध्ये ७ जणांना लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:22 IST2021-12-17T18:14:41+5:302021-12-17T18:22:24+5:30
पुण्याच्या जुन्नरमध्ये नारायणगाव - वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचे तब्बल ७ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात या नव्या विषाणूने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Omicron Patient in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही ओमायक्रॉनची 'एंट्री'; जुन्नरमध्ये ७ जणांना लागण
पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर मुंबईत, पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे शहर, डोंबिवली, नागपूर आणि लातूर या शहरांमध्ये रुग्ण आढळून आले होते. परंतु राज्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळून आला नाही. पण आज पुण्याच्या जुन्नरमध्ये नारायणगाव - वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचे तब्बल ७ रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात या नव्या विषाणूने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेबरोबरच नगरपालिका प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यात हे सात रुग्ण १५ दिवसापूर्वी दुबईवरून आले होते. त्यानंतर मागच्या शनिवारी त्यांचा अहवाल पुण्याच्या एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आला होता. आज त्याचा निकाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील ५० जणांचे अहवाल एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. सातही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना नारायणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोव्हीड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्येजुन्नर ठरला होता कोरोनाचा हॉटस्पॉट
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये जुन्नर तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. त्यांनतर आता ओमायक्रॉनचे एकदम सात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे सांगण्यात येत आहे.
पुणे, मुंबई आणि नागपूर विमानतळावर १ डिसेंबरपासून आजपर्यंत अतिजोखमीच्या देशांतून १२,९९६ प्रवासी, तर इतर देशांतून ७१,०८२ असे एकूण ८५ हजार ७८ प्रवासी दाखल झाले. त्यापैैकी १४ हजार ७७७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. जनुकीय तपासणीसाठी अतिजोखमीच्या देशातील २४ तर इतर देशांमधील ८ अशा ३२ रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले आहेत.