कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून पदाधिकाऱ्यांत खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2015 03:17 IST2015-12-06T03:17:17+5:302015-12-06T03:17:17+5:30
महापौर चषक स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर एका बाजूला, तर अन्य पदाधिकारी दुसऱ्या, अशी स्थिती आज झाली.

कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून पदाधिकाऱ्यांत खडाजंगी
पुणे : महापौर चषक स्पर्धेतील कुस्ती स्पर्धेच्या ठिकाणावरून महापालिका पदाधिकाऱ्यांमध्ये महापौर एका बाजूला, तर अन्य पदाधिकारी दुसऱ्या, अशी स्थिती आज झाली. छत्रपती शिवाजी आखाडा की कात्रज मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल याचा अंतिम निर्णय आता महापौरांनी राखीव ठेवला आहे. दरम्यान, यंदापासून अर्जुन, द्रोणाचार्य हा केंद्राचा व शिवछत्रपती हा राज्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या पुुणेकर खेळाडूंना १ लाख रुपये देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सभागृह नेते बंडू केमसे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, काँग्रेसचे गटनेते, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, मनसेचे राजेंद्र वागस्कर , क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र पठारे आदी उपस्थित होते.
मंगळवार पेठेतील छत्रपती शिवाजी कुस्ती मैदान हे मध्यवस्तीत आहे. या मैदानावर ऐतिहासिक कुस्ती झाल्या आहेत. त्यामुळे महापौर कुस्ती स्पर्धा या मैदानावर घ्याव्यात,असा आग्रह काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी धरला.
मनसेचे वागस्कर यांनीही याला पाठिंबा दिला. मात्र, कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे स्पर्धा घ्यावी, असा आग्रह खुद्ध महापौरांनीच धरला. बऱ्याच चर्चेनंतरही यावर काही निर्णय होऊ शकला नाही. महापौरांनीच यावर आपण नंतर निर्णय जाहीर करू, असे सांगितले.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य हे पुरस्कार मिळवणाऱ्या पुणेकर खेळाडूला एक लाख रुपये देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वर्षी पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंपासून ही सुरूवात करणार असल्याची माहिती महापौर धनकवडे यांनी दिली.
डिसेंबर ते जानेवारीदरम्यान होणाऱ्या महापौर चषक स्पर्धेत २८ खेळांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेसाठी एकूण अडीच कोटी रूपये खर्च येईल, असा अंदाज आहे. मागील वर्षीप्रमाणेच याही वर्षी खर्चात बचत करण्याचा प्रयत्न आहे, असे महापौरांनी सांगितले. (प्रतिनिधी)