पदाधिकारी बदलाला पूर्णविराम
By Admin | Updated: February 13, 2016 03:15 IST2016-02-13T03:15:44+5:302016-02-13T03:15:44+5:30
राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आतापर्यंत जिल्हा परिषदेत अनेकांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. तसेच पक्षाच्या वतीने चांगले काम करणाऱ्यांना प्रमोशन (बढती)
पदाधिकारी बदलाला पूर्णविराम
पुणे : राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने आतापर्यंत जिल्हा परिषदेत अनेकांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. तसेच पक्षाच्या वतीने चांगले काम करणाऱ्यांना प्रमोशन (बढती) देखील दिले जाते, असे सूचक विधान करत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदला पूर्णविराम दिला असल्याची चर्चा रंगली आहे.
जिल्हा परिषदेच्या कुपोषणमुक्त पुणे जिल्हा, सप्ततारांकित आरोग्य योजना, शंभर टक्के शालेय विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी कार्यक्रम या प्रमुख योजनांचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांच्यासह
सर्व पदाधिकारी, अधिकारी, सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
या वेळी पवार म्हणाले, पुणे जिल्हा हा राज्यात प्रगत व शाश्वत विकास करणारा जिल्हा आहे. पुण्याने देशाला आणि राज्याला शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय ठेवा दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात मुळातच कुपोषित मुले जन्माला येऊच नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. याशिवाय मुलींच्या जन्मदराचे प्रमाणदेखील निराशाजनक असून, हे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे जिल्ह्याचा वार्षिक विकास आराखाडा पूर्वी केवळ ४० कोटींचा होता. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रस सत्तेत असताना तब्बल ६०० हजार रुपयांपर्यंत वाढवला. परंतु आता त्यात मोठी कपात करण्यात आली आहे. निधीच नसला तर अधिकारी आणि पदाधिकारी विकासकामे कशी कारणार? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. जिल्ह्यासाठी जास्तीचा निधी मिळावा यासाठी पालकमंत्री गिरीश बापट आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी कंद यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उमाप यांनी तर शुक्राचार्य वांजळे यांनी आभार मानले.