शहरातील वृक्षसंख्येत पाच वर्षांत साडेआठ लाखांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:15 IST2021-08-23T04:15:06+5:302021-08-23T04:15:06+5:30

पुणे : देशातील मोजक्या ‘ग्रीन सिटीज्’मध्ये मोडणाऱ्या पुणे शहराची ही ओळख पक्की करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच ...

The number of trees in the city has increased by eight and a half lakhs in five years | शहरातील वृक्षसंख्येत पाच वर्षांत साडेआठ लाखांची वाढ

शहरातील वृक्षसंख्येत पाच वर्षांत साडेआठ लाखांची वाढ

पुणे : देशातील मोजक्या ‘ग्रीन सिटीज्’मध्ये मोडणाऱ्या पुणे शहराची ही ओळख पक्की करण्याच्या दृष्टीने महापालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील वृक्षसंख्येत जवळपास साडेआठ लाखांची वाढ झाली आहे. वृक्षराजी आणखी वाढविण्याच्या हेतूने शहरातील टेकड्यांवर हरितक्षेत्र विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, त्यासाठी २६.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

२०२०-२१ च्या पर्यावरण सद्यःस्थिती अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या ४७ लाख १३ हजारांवर पोचली असून, लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण प्रतिव्यक्ती १.३९ वृक्ष एवढे आहे. २०१६-१७ च्या पर्यावरण अहवालानुसार, शहरातील वृक्षांची संख्या ३८ लाख ६० हजार इतकी होती, तरलोकसंख्येच्या तुलनेत वृक्षांचे हे प्रमाण प्रतिव्यक्ती १.२३ वृक्ष इतके होते. २०१६ नंतर शहरात मेट्रो, रस्तेसुधार, दुमजली उड्डाणपूल इत्यादी मोठ्या प्रकल्पांना सुरुवात झाली. मात्रहे प्रकल्प राबवीत असताना पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी महापालिका आग्रही होती. यासह महापालिकेने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहरातील वृक्षांच्या संख्येत २२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 'जीपीएस' प्रणालीच्या साहाय्याने पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वृक्षगणना करण्यात आली. त्यानुसार शहरात वृक्षांच्या एकूण ४२९ प्रजाती आढळून आल्या आहेत. महापालिकेत नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील वृक्षांची गणना यात झालेली नाही. कात्रज येथील 'राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व वन्यप्राणी संशोधन केंद्रा'मुळे शहरात सर्वाधिक ११ लाख १३ हजार वृक्ष धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आहेत. तर दाट लोकवस्तीमुळे सर्वात कमी वृक्ष भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात आहेत. या भागात केवळ १२ हजार वृक्ष आहेत. पर्वती, भांबुर्डा, वारजे आणि धानोरी येथील एकूण १,८२६ एकर वनक्षेत्र पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. वन विभागाच्या साहाय्याने पुणे महापालिकेतील 'संयुक्त वन व्यवस्थापन समिती'द्वारे येथील टेकड्यांवरील वृक्षांचे संवर्धन केले जाते. याशिवायपुणे जिल्ह्यातील पडीक जमिनींची माहितीही एकत्रित करण्यात आली आहे. त्यांपैकी किती जमिनींवर छोटी वनक्षेत्रे तयार करता येतील, याची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली गेली आहे. पहिल्या टप्प्यात वारजे येथील ५०,तर महंमदवाडी येथील ४५ एकर जमिनीचे छोट्या वनक्षेत्रात रूपांतर केले जाणार आहे.

---------------------

कोटः पायाभूत सुविधांचा विकास करताना त्यात पहिला बळी पर्यावरणाचा जातो, हा आजवरचा अनुभव आहे. मात्रपुणे महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असताना हरितक्षेत्र मात्र कमी न होता वृद्धिंगत झाले आहे. शाश्वत विकासाच्यादृष्टीने नियोजन आणि कृती हे यामागचे मुख्य कारण आहे.

हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

Web Title: The number of trees in the city has increased by eight and a half lakhs in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.