माझं शिवार बी होऊ दे आता आबादानी...!
By Admin | Updated: June 13, 2017 03:55 IST2017-06-13T03:55:19+5:302017-06-13T03:55:19+5:30
कर्जमाफीने पिचलेल्या आणि परिस्थितीने गांजलेल्या बळीराजाला सुखावणाऱ्या दोन गोष्टी एकाच दिवशी घडल्या. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भावना

माझं शिवार बी होऊ दे आता आबादानी...!
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्जमाफीने पिचलेल्या आणि परिस्थितीने गांजलेल्या बळीराजाला सुखावणाऱ्या दोन गोष्टी एकाच दिवशी घडल्या. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भावना जाणून घेत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आणि त्याच वेळी त्याच्या शिवारात ‘मॉन्सून’चे आगमन झाले.
सुखावलेल्या बळीराजाला आता पेरणीचे वेध लागले असून तो आता काळ््या मातीमध्ये रमणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा पोशिंदा आंदोलनांमध्ये व्यस्त होता. स्वत:च पिकवलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून देताना आणि दूध ओतून देताना रोष व्यक्त करताना दिसत होता. पण त्या आंदोलनाला अखेरीस यश आले. शेतकऱ्यांच्या बुलंद आवाजापुढे शासनही नमले आणि शेतकऱ्याला न्याय मिळेल, कर्जाच्या जोखडातून तो मुक्त होईल अशी आशा निर्माण झाली. त्याच्याच जोडीला त्याच्या शिवारात पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दुहेरी आनंद झाला आहे. पुणे जिल्ह्यात आज सकाळपासूनच मॉन्सूनने हजेरी लावली होती. खेड, जुन्नर, बारामती, इंदापूर, भोर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आणि शेती शिवारात सगळीकडे पाणी साठले.
त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि योग्य वेळी पावसाचे आगमन झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला.
गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी त्या आधी
पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. यावर्षी खरिप हंगामाच्या सुरूवातीलाच सुखदायक वातावरण निर्माण झाल्याने चांगल्या पिकपाण्याची आशा बळीराजाला आहे. पावसाने आणि सरकारने दिलेल्या या नवसंजीवनीमुळे नव्या दमाने आपले शिवार फुलवण्यास बळीराजा सज्ज झाला आहे.
संपूर्ण हंगामात हे वातावरण कायम राहिल या आशेने जिल्ह्यात पुन्हा शेतीच्या कामात गुंतला
आहे. माझं शिवार बी होऊ दे आबादानी अशी अपेक्षा बळी राजा व्यक्त करत आहे.