आता मुलाबाळांचं आयुष्य स्मशानात नको!
By Admin | Updated: August 13, 2014 04:51 IST2014-08-13T04:51:16+5:302014-08-13T04:51:16+5:30
जन्म स्मशानात, बालपण स्मशानात, तारुण्य स्मशानात, विवाहही स्मशानात आणि आयुष्याचा शेवटही स्मशानात

आता मुलाबाळांचं आयुष्य स्मशानात नको!
प्रवीण गायकवाड (शिरूर)
जन्म स्मशानात, बालपण स्मशानात, तारुण्य स्मशानात, विवाहही स्मशानात आणि आयुष्याचा शेवटही स्मशानात... असे पिढ्यान्पिढ्या स्मशानचक्रात अडकलेल्या ‘स्मशानजोगी’ समाजातील गंगाराम सूर्यभान जाधव या २६ वर्षीय तरुणाला आपल्या बहिणी व दोन मुलींना या चक्रातून बाहेर काढायचंय. म्हणून आपल्या तुटपुंज्या पगारातून तो बहिणींच्या शिक्षणासाठी खर्च करीत असून, मोठ्या मुलीलाही बालवाडीत दाखल केले आहे.
गंगारामचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. मात्र, कुटुंबातील प्रथेप्रमाणे तोही येथील ‘अमरधाम’ या स्मशानभूमीत ‘स्मशानजोगी’ म्हणूनच आयुष्य व्यतित करीत आहे. स्मशानाची साफसफाई करणे, त्याची निगा राखणे, असे प्रमुख काम गंगाराम या स्मशानाभूमीत करीत आहे. नगर परिषदेने त्याची नियुक्ती केली आहे.
गंगारामशी चर्चा करताना त्याला ‘स्मशानजोगी’ म्हणून जगताना स्मशानातील जीवनचक्रातून बाहेर पडण्याची इच्छा असल्याचे जाणवले. मी जरी स्मशानात राहणार असलो, तरी माझ्या दोन बहिणी व दोन मुली यांना या चक्रातून बाहेर काढून शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तो आत्मविश्वासाने सांगतो. गंगारामला तीन बहिणी. एकीचे लग्न झाले. ती दहावी शिकलेली. मात्र, तीदेखील पारनेर येथील स्मशानभूमीत राहते. दुसऱ्या दोन बहिणी अहमदनगर येथे शिकत आहे. लता जाधव ही बारावीत शिकत असून, धाकटी सविता जाधव ही दहावीत आहे. त्यांना शिक्षण देण्याचा त्याचा मानस आहे.