Railway: आता ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास पॅसेंजरच्या दरात, रेल्वे बोर्डाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:58 AM2024-02-24T11:58:37+5:302024-02-24T12:00:01+5:30

सध्या रेल्वे बोर्डाने डेमू व मेमू या गाड्यांना पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे तिकीट दर लागू केले आहे....

Now 'Demu' and 'Memu' travel at passenger rate, Railway Board's decision | Railway: आता ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास पॅसेंजरच्या दरात, रेल्वे बोर्डाचा निर्णय

Railway: आता ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास पॅसेंजरच्या दरात, रेल्वे बोर्डाचा निर्णय

पुणे : कोरोना काळात रेल्वे बोर्डाने डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) व मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) या रेल्वे गाड्यांना तिकीट दर एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणे आकारले जात होते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत होता. प्रवाशांकडून डेमू आणि मेमू या गाड्यांचे तिकीट दर कमी करण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती. सध्या रेल्वे बोर्डाने डेमू व मेमू या गाड्यांना पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे तिकीट दर लागू केले आहे. त्यामुळे ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास आता ‘स्वस्त' झाला आहे.

पुणे विभागात दौंड, कोल्हापूर, सातारा व इतर ठिकाणी सुमारे २५ ते २७ डेमू व मेमू रेल्वे गाड्या धावतात. यातून दैनंदिन सुमारे ४० ते ५० हजार प्रवासी प्रवास करतात. पॅसेंजरचे कमीत कमी तिकीट दर १० रुपये आहे, तर एक्स्प्रेसचे तिकीट दर ३० रुपये आहे. रेल्वे बोर्डाने पूर्वीप्रमाणे निर्णय घेतल्यामुळे डेमू व मेमू गाड्यांचे तिकीट दर कमीत कमी १० रुपये होईल. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

कोरोना काळात कमीत-कमी प्रवाशांनी रेल्वे प्रवास करावा, या हेतूने रेल्वे बोर्डाने डेमूच्या तिकिटाचे दर वाढविले होते. ते आजतागायत वाढीव तिकीट दर आकारले जात होते. सुविधेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवाशांकडून तिकीट दर कमी करण्याची मागणी वारंवार करत होती. तरीही तिकीट दर कमी न झाल्याने सामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. आता तिकीट दर कमी केल्याने प्रवाशांचा फायदा होणार आहे.

Web Title: Now 'Demu' and 'Memu' travel at passenger rate, Railway Board's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.