भोर शहराला आता गढूळ पाणी
By Admin | Updated: July 3, 2017 02:52 IST2017-07-03T02:52:22+5:302017-07-03T02:52:22+5:30
नियोजनाअभावी भाटघर धरणातून भोर नगरपालिकेच्या दोनपैकी एका इन्टेकवेलला येणारे पाणी कमी पडत असल्याने दोन मोटर व्यवस्थित सुरू

भोर शहराला आता गढूळ पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : नियोजनाअभावी भाटघर धरणातून भोर नगरपालिकेच्या दोनपैकी एका इन्टेकवेलला येणारे पाणी कमी पडत असल्याने दोन मोटर व्यवस्थित सुरू राहत नाहीत. त्यामुळे एका महिन्यापासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात एक फिल्टर प्लान्ट खराब झाल्याने चार दिवसांपासून निम्म्या शहराला गाळमिश्रित दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. दर पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते.
भाटघर धरणाच्या खाली १९७४ विहिरी काढून पहिली नळ-पाणीपुरवठा योजना करण्यात आली, तर १९९० मध्ये नवीन इंजिनघर बांधण्यात आले. ९० एचपीचे दोन व ५० एचपीचे दोन असे चार पंप असून त्यापैकी दोन पंपांनी पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज साधारणपणे २० लाख लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र भाटघर धरणाच्या व्हॉल्व्हमधून पाणी सोडले जाते. मात्र या ठिकाणी भिंत नसल्याने ते पाणी विहिरीत न जाता नदीत जाते. त्यामुळे विहिरीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने पंप सुरळीत चालत नाहीत.
त्यातच दोनपैकी एकच फिल्टर प्लान्ट सुरू व दुसरा बंद असल्याने निम्म्या भोर शहराला गाळमिश्रीत गढूळ आणि दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे साथीचे आजार उद्भवण्याची भीती आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाचे
दुर्लक्ष आहे.
शहरात नगरपालिकेने नवीन वितरण लाईन टाकली आहे. त्यामुळे उच्च दाबाने अधिक पाणीपुरवठा सुरू आहे. त्यातच विहिरीला कमी पाणी येत असल्याने पुरेशा प्रमाणात पंप चालत नाही.
शहराला लागणारे पाणी अधिक प्रमाणात लागते, मात्र पालिकेची साठवणक्षमता कमी असल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.
दोनपैकी एका फिल्टरच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे.
लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे उपनगराध्यक्ष उमेश देशमुख यांनी सांगितले.
मे ते आॅगस्ट हीच परिस्थिती
नगरपालिकेच्या दुसऱ्या इन्टेकवेलला पाणी पुरावे म्हणून धरणाच्या व्हॉल्व्हमधून सोडलेले पाणी बांध घालून चारी काढून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अडवले आहे. मात्र तरीही पाणी येत नाही, त्यासाठी नदीपात्रात भिंत घालणे गरजेचे आहे, तरच पाणी पुरणार आहे. दरवर्षी उन्हाळ््यात धरणातील पाणी कमी पडले, की ही परिस्थती निर्माण होते. या वेळी पुन्हा धरणे भरून पाणी सोडेपर्यंत साधारणपणे मे ते आॅगस्ट महिन्यापर्यंत अशीच अवस्था असते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
नगरपालिकेकडे कायमस्वरुपी कर्मचारी कमी असल्याने ७ ते ८ जणांना तात्पुरत्या स्वरूपात कर्मचारी घेतले आहेत. मात्र निधीअभावी अनेकदा या कर्मचाऱ्यांना कमी केले जाते. यामुळे पाणीपुरवठा विभागात कर्मचारी कमी पडतात. धरणातून भोर नगरपालिकेच्या विहिरीसाठी सोडलेल्या पाण्याचे नगरपालिकेकडून पाटबंधारे विभाग दर दोन महिन्याला साधारणपणे ३० हजारघेतले जातात. वर्षाला एक लाख ८० हजार रुपये घेतात, मग पाण्याचे योग्य नियोजन का होत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
नगरपालिकेच्या दोनपैकी एक फिल्टर नादुरुस्त असून त्याचे काम सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर शहराला नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
- तृप्ती किरवे, नगराध्यक्षा